दारणाच्या पाणलोटात पुन्हा मुसळधार
सार्वमत

दारणाच्या पाणलोटात पुन्हा मुसळधार

विसर्ग 1750 वरून 7716 क्युसेकवर, कडवातून 1272 ने विसर्ग

Arvind Arkhade

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

दारणाच्या पाणलोटात काल दिवसभर मुसळधार पाऊस सुरू झाल्याने पाण्याची नविन आवक होत असल्याने दारणातील विसर्ग 7716 क्युसेकने करण्यात आला. गोदावरीतील विसर्ग 4842 क्युसेकवर स्थिर होता, मात्र रात्रीतून गोदावरीतील विसर्ग काहिसा वाढणार आहे. खाली जायकवाडीचा उपयुक्तसाठा काल सायंकाळी 6 वाजता 71.20 टक्के इतका झाला होता.

गेल्या दोन दिवसांपासून दारणा व अन्य धरणांच्या पाणलोटात पाऊस मंदावला होता. परंतु गुरुवारी पहाटेनंतर व काल दिवसभर दारणाच्या पाणलोटातील घोटी, इगतपुरी परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे परवा 1750 क्युसेकने सुरू असलेला दारणाचा विसर्ग काल सकाळी 6 वाजता 3220 क्युसेकने करण्यात आला.

हा विसर्ग काल दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू होता. 3 वाजे नंतर हा विसर्ग वाढवून 5006 क्युसेक इतका करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता तो 7716 क्युसेक करण्यात आला. 7149 क्षमतेच्या दारणात 6557 दलघफू पाणीसाठा असून काल सकाळी या धरणाचा साठा 91.72 टक्के होता.

भावली 100 टक्के भरले असल्याने त्याच्या सांडव्यावरून दारणाच्या दिशेने 290 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कडवा 100 टक्के झाल्याने काल सकाळी 6 वाजता त्यामधून सुरुवातीला 828 क्युसेकने नंतर सायंकाळी 4 वाजता 1272 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. वालदेवी धरणातून 406 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

वरील विसर्ग नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने काल सकाळी 6 वाजता या बंधार्‍यातून गोदावरीत 4842 क्युसेकने विसर्ग सुरू होता. तो सकाळी 11 वाजता 6310 क्युसेक करण्यात आला. त्यानंतर पुन्हा 4842 क्युसेक वर आणण्यात आला. काल सकाळी 6 पर्यंत एकूण पावने बारा टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

गंगापूर 88.66 टक्के !

गंगापूर धरणाच्या पाणलोटात काल हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. 5630 क्षमतेच्या या धरणात 4992 दलघफू पाणी साठा तयार झाला आहे. हे धरण 88.66 टक्के भरले आहे.

जायकवाडीत 54.5 टीएमसी

जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता 12930 क्युसेकने नविन पाण्याची आवक होत होती. या जलाशयात उपयुक्तसाठा 71.20 टक्के इतका झाला होता. उपयुक्तसाठा 54.5 टीएमसी तर मृतसह एकूण साठा 80.6 टीएमसी इतका झाला आहे.

अन्य धरणांचे साठे असे

पालखेड 72.68 टक्के, कडवा 100 टक्के, मुकणे 64.33 टक्के, भोजापूर 100 टक्के, आळंदी 31.26 टक्के, कश्यपी48.75 टक्के, वालदेवी 100 टक्के, गौतमी गोदावरी 56.97 टक्के, वाकी 56.26, भाम 100 टक्के.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com