दारणाच्या पाणलोटात संततधार !

दारणाचा 2720 तर गोदावरीतील विसर्ग 2421 क्युसेकवर
दारणाच्या पाणलोटात संततधार !

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

दारणा च्या पाणलोटातील इगतपुरी, घोटी परिसरात काल दिवसभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दारणातील पाण्याची आवक वाढल्याने त्यातून सुरू असलेला 1250 चा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवत तो 2720 क्युसेकपर्यंत नेण्यात आला. गोदावरीतील विसर्ग 1614 वरुन 2421 क्युसेक इतका वाढविण्यात आला आहे. गंगापूरच्या पाणलोटातही पावसाने मध्यम स्वरुपाची हजेरी लावली.

दारणाचा साठा काल सकाळी 6 वाजता 91.72 टक्क्यांवर पोहचला होता. 7149 दशलक्षघनफूट क्षमतेच्या या धरणात 6557 दशलक्षघनफूट इतका पाणीसाठा झाला होता. काल सायंकाळी दारणाचा साठा 91.93 टक्के स्थिर ठेवून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. काल सकाळी 1250 क्युसेकने विसर्ग नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या दिशेने सुरू होता. काल दिवसभर दारणाच्या पाणलोटातील घोटी, इगतपुरी भागात जोरदार पाऊस झाला.

काल सकाळी 6 वाजता संपलेल्या 24 तासांत दारणात 126 दलघफू नविन पाणी दाखल झाले होते. त्यामुळे दारणात नविन पाण्याची आवक वाढू लागल्याने दारणाचा विसर्ग दुपारी 12 वाजता 1250 वरून 1935 क्युसेक इतका करण्यात आला.

त्यानंतर तो काल सायंकाळी 6 वाजता 2720 क्युसेक इतका करण्यात आला. अजुनही रात्रीतुन दारणाचा विसर्ग पाण्याची आवक जसजशी वाढेल तसा विसर्ग काही प्रमाणात वाढू शकतो. 100 टक्के भरलेल्या भावलीच्या पाणलोटातही जोरदार पाउस झाला.

भावलीतुन 481 क्युसेकने सकाळी विसर्ग सुरु होता. दिवसभरातील पावसाने त्याच्या सांडव्यावरुन वाहाणार्‍या पाण्यात दिवसभरात वाढ झाली. त्यामुळे भावलीचा विसर्ग 481 वरुन 701 क्युसेक इतका झाला आहे. काल दिवसभरातील 12 तासात दारणाला 15 मिमी, भावलीला 48 मिमी पावसाची नोंद झाली. घोटी, इगतपूरीला पावसाची संततधार सुरु होती.

दारणा, भावलीच्या तुलनेत गंगापूर च्या पाणलोटात पावसाचे प्रमाण कमी आहे. काल दिवसभरातील 12 तासात गंगापूर च्या भिंतीजवळ गंगापूरला 30, त्र्यंबक 43, गौतमी 32, कश्यपी 10, अंबोलीला 67 मिमी असा पाउस झाला. पावसाने सह्यद्रिचा घाटमाथा पाझरु लागल्याने नविन पाणी धरणांमध्ये दाखल होत आहे. काल सकाळी गंगापूर 58.29 टक्के इतके भरले होते. काल सायंकाळपर्यंत ते 60 टक्क्यांपर्यंत पोहचलेले असेल.

दारणातील विसर्ग वाढविल्याने हे पाणी दारणा नदीतून गोदावरी मार्गे नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात पोहचत असल्याने या बंधार्‍यात पाण्याची आवक वाढल्याने त्यातुन सकाळी 6 वाजता 1614 क्युसेकने सुरु असलेला गोदावरीतील विसर्ग दुपारी 12 वाजता 2421 क्युसेक इतका करण्यात आला.

भंडारदरा 75 टक्के भरण्याच्या मार्गावर

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

कळसुबाई शिखराच्या पर्वतरांगा व पाणलोटात संततधार सुरुच असल्याकारणाने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. 11030 दलघफूट पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा काल सायंकाळी 7951 दलघफू वर पोहचला आहे. हे धरण 75 टक्के भरण्याच्या मार्गावर आहे.

पावसाचे आगार समजल्या जाणार्‍या भंडारदरा पाणलोटात मात्र यंदा पावसाची प्रतीक्षा करण्याची वेळ आली परंतु गेल्या चार दिवसांपासून कळसुबाई शिखराच्या पर्वतरांगा व धरण पाणलोटात संततधार टिकून असल्याने नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागल्याने धरण साठ्यात झपाट्याने वाढ होवू लागली आहे.

पाणलोटात सुरू असलेल्या संततधारमुळे भातशेतीला नवसंजीवनी मिळाल्याने आदिवासी शेतकरी बांधवांच्या चिंता दुर झाल्या आहेत तर वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाल्याने धुण्या पेटत्या झाल्या आहेत. घाटघर परिसराला तर घनदाट धुक्यांनी घेरले आहे. निसर्ग सौंदर्याने नटल्याने वनराई हिरवीगार झाली आहे. पर्यटकांना आकर्षित करणारे धबधबे पर्यटकांविना खळखळून वाहत आहे.

पाणलोटात पाऊस

काल सकाळी 6 वाजता पाणीसाठा 70 टक्के झाला दिवसभर पावसाची संततधार सुरुच होती. त्यामुळे सायंकाळी 6 वाजेपर्यंत धरणसाठी 73 टक्क्यावर जावून पोहचला. धरणात 234 दुलघफू नवीन पाण्याची आवक झाली. आज धरणसाठा 75 टक्के होईल.घाटघरमध्ये पाच इंच पावसाची नोंद झाली. धरण पाणलोटात झालेला पाऊस पुढील प्रमाणे, घाटघर-122 मी.मी., रतनवाडी 97 मी.मी., पांजरे 85 मी.मी., वाकी 65 मी.मी., भंडारदरा 77 मी.मी.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com