दारणातून 10486 क्युसेकने विसर्ग सुरुच

गंगापूरमधून आज विसर्ग, गोदावरीत 12620 क्युसेकने पाणी
दारणातून 10486 क्युसेकने विसर्ग सुरुच

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

दारणा, भावली धरणांचा घाटमाथा दमदार पावसाने कालही झोडपून काढला. यामुळे या धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक चांगली होत असल्याने दारणाचा विसर्ग काल दिवसभर 10486 क्युसेकने सुरू होता.

नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 12620 क्युसेकने विसर्ग सुरू होता. गंगापूर धरण 93 टक्के भरले आहे. आज रविवारी या धरणातून केव्हाही विसर्ग सुरू होऊ शकतो! खाली जायकवाडी धरणात काल सायंकाळी 6 वाजता नविन पाण्याची आवक 24137 क्युसेकने होत होती. जायकवाडी जलाशयात काल सायंकाळ पर्यंत 76.10 टक्के उपयुक्तसाठा झाला होता.

गेल्या चार पाच दिवसांपासून दारणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दारणा, भावली तसेच इगतपुरी तालुक्यांतील अन्य धरणांमध्ये नवीन पाणी दाखल होत आहे. 7149 क्षमतेच्या दारणात 6616 दलघफू पाणीसाठा असून या धरणातून काल सकाळपर्यंत 7341 दलघफू पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

दारणात 92.54 टक्के पाणीसाठा आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत दारणात 907 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. काल दिवसभर या धरणातून 10486 क्युसेकने विसर्ग सुरू होता. 100 टक्के भरलेल्या भावलीतून 701 क्युसेकने विसर्ग सुरु होता. तर कडवातून 1272 क्युसेक तर वालदेवीतून 406 क्युसेकने विसर्ग सुरु होता.

नांदुरमधमेश्वर बंधार्‍यात पाण्याची आवक सुरुच असल्याने काल सकाळी या बंधार्‍यातून 12620 क्युसेकने विसर्ग स्थिर आहे. काल सकाळी सहा वाजेपर्यंत या बंधार्‍यातून 13.4 टीएमसी पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या दिशेने करण्यात आला होता.

गंगापूर 93 टक्क्यांवर !

गंगापूर धरणाच्या पाणलोटात मध्यम स्वरुपाचा पाऊस अधुन मधून पडतो. हे धरण 93 टक्क्यांवर पोहचले आहे. 5630 क्षमतेच्या या धरणात 5238 दलघफू पाणीसाठा आहे. हे धरण पाऊस टिकून राहिला तर आज या धरणातून विसर्ग सुरु होणार आहे. दरम्यान नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेसह आयुक्त पातळीवरुन गोदावरी काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जायकवाडीत 24137 क्युसेकने आवक !

जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार 24 हजार 137 क्युसेकने नवीन पाणी दाखल होत होते. या धरणात गोदावरीतून 12620 क्युसेक, निळवंडे धरणातुन 5426 क्युसेक (ओझर प्रवरा येथे 5711 क्युसेक) इतका विसर्ग प्रवरेतून सुरु होता. याशिवाय जायकवाडीच्या गोदा- प्रवरा पाणलोट वगळता त्या भागातील पाणलोटातून अन्य विसर्ग असा 24137 क्युसेकने विसर्ग मिळत होता. काल सायंकाळी 6 वाजता जायकवाडी जलाशयात 76.10 टक्के पाणीसाठा झाला होता. उपयुक्त साठा 58.3 टीएमसी तर मृतसह एकूण साठा 84.4 टीएमसी इतका साठा होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com