दारणा
दारणा
सार्वमत

दारणा पाणलोटात दमदार पाऊस

Arvind Arkhade

अस्तगाव|वार्ताहर|Astgav

काल सकाळी सहा वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासांत भावलीला तब्बल 147 मिमी पाऊस झाला! त्यामुळे भावली धरण पूर्ण क्षमतेने भरून काल सकाळी 6 वाजता ते ओव्हरफ्लो झाले. त्याच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला. हे पाणी खाली दारणा धरणात दाखल होत असल्याने दारणातूनही काही दिवसांत ओव्हरफ्लो सुरू होऊ शकतो. मोसमी पाऊस खर्‍या अर्थाने सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये भावली पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले होते. मागील वर्षी पर्जन्यमान चांगले राहिल्याने दारणा 14 जुलैला, भावली 26 जुलैला तर गंगापूर 29 जुलैला ओव्हरफ्लो झाले होते. यावर्षी धरणांच्या पाणलोटात पावसाचे जुलैमध्ये अल्प राहिल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक होत नव्हती.

परंतु मंगळवारी 4 ऑगस्टला रात्रभर जोरदार हजेरी लावल्याने पहिल्या टप्प्यात इगतपुरी तालुक्यातील भावली काल सकाळी 5 ऑगस्टला ओव्हरफ्लो झाले आहे. 1434 क्षमतेचे हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणाला गेट नाहीत. त्याच्या सांडव्यावरुन सकाळी 6 वाजता 73 क्युसेकने पाणी वाहने सुरु झाले.

हे पाणी खाली 35 किमी अंतरावरील दारणात येऊन मिळणार आहे. दारणाचे बॅकवॉटर 15 किमी आहे. भावलीतील विसर्ग पाण्याला 20 किमी प्रवास केल्यानंतर ते दारणाच्या बॅकवॉटरमध्ये सामावणार आहे. त्यामुळे दारणाची पाण्याची पातळी आता हळूहळू वाढणार आहे. काल सायंकाळी 75 टक्क्यांपर्यंत दारणा पोहचले होते. ते आज सकाळी 6 वाजेपर्यंत 80 टक्क्यांपर्यंत जाऊ शकेल असा अंदाज आहे.

काल सकाळी 6 वाजता दारणा 71.49 टक्के होते. या धरणाच्या पाणलोटातील घोटीला काल सकाळी संपलेल्या 24 तासांत घोटी येथे 74, दारणाच्या भिंतीजवळ 53, तर इगतपुरीला 109 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे सकाळी सहा वाजेपर्यंत दारणात 116 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले होते. थोड्याच दिवसात दारणाचा विसर्गही सुरु होणार आहे.

गंगापूर धरणाचा साठा सकाळी 51.98 टक्के होता. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत गंगापूरला 37, अंबोलीला 61, त्र्यंबकला 52 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. महिनाभरापासून गंगापूरला पावसाने विश्रांती घेतली होती. कश्यपीला 11 मिमी, गौतमीला 34 मिमी असा पाऊस नोंदला गेला.

काल दिवसभरात 12 तासांत गंगापूरला 10 मिमी, त्र्यंबकला 13 मिमी, अंबोलीला 36 मिमी पावसाची नोंद झाली. काल दिवसभरातील 12 तासांत कश्यपीला 12 मिमी, गौतमीला 29 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर तसेच गंगापूर समुहातील धरणांच्या परिसरात धुव्वाधार पावसाची गरज आहे. पाऊस कायम राहिल्यास गंगापूर समुहातील धरणांचे साठे ही फुगतील. परंतु पावसाचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळेे ओव्हरफ्लोसाठी गंगापूरला प्रतिक्षा करावी लागणार आहे.

गोदावरी कालव्यांना पाणी!

दरम्यान नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या पाणलोटातही पावसाचे प्रमाण कमी झाल्याने गोदावरी नदीतील विसर्ग सोमवारी बंद करण्यात आला आहे. 1 जूनपासून गोदावरीत नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून 44 हजार 218 क्युसेक इतके पाणी सोमवारपर्यंत सोडण्यात आले होते. हे पाणी 3.8 टीएमसी इतके आहे. सोमवारी दुपारी 1 वाजता गोदावरी कालव्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. उजव्या कालव्याला 200 क्युसेकने तर डाव्या कालव्याला 100 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. आज रात्रीतून पाणी राहाता, अस्तगाव परिसरात दाखल होईल असा अंदाज आहे.

जायकवाडी 54 टक्के !

जायकवाडी जलाशयात उपयुक्तसाठा 54 टक्के इतका आहे. 41.6 टिएमसी उपयुक्तसाठा या धरणात आहे. 1 जूनला या धरणात 29.2 टिएमसी पाणी साठा होता. तर मृतसह एकूण साठा 55.2 टिएमसी इतका होता. मराठवाड्यातील पावसाने काल 5 ऑगस्ट ला सकाळी 6 वाजेपर्यंत 1 जून पासून 12.4 टिएमसी पाणी नव्याने दाखल झाले आहे. त्यामुळे जायकवाडीत 41.6 टिएमसी उपयुक्त साठा तयार झाला ओह. तर मृतसह एकुण साठा 67.7 टिएमसी इतका आहे. जायकवाडीत उपयुक्तसाठ्याच्या 76 टिएमसीच्या 65 टक्के म्हणजेच 50 टिएमसी पाणी गरजेचे आहे. त्यापैकी आता 41.6 टिएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. अजून 9 टिएमसी पाण्याची गरज आहे.

सध्या जायकवाडीचे पाणलोट क्षेत्रात आजपर्यंत घाटमाथा वगळता सातत्याने पाऊस होत आहे. त्यामुळे ओढे नाले यांना पाणी येऊन नद्या प्रवाहित झाल्या आहेत. जायकवाडीत साधरणत: दिड ते दोन टिएमसी पाण्याची आवक होत आहे. आता पर्यंत 12.4 टिएमसी पाण्याची आवक झाली आहे. सध्याची परिस्थिती पाहता मेंढीगिरी अहवालाप्रमाणे जायकवाडीत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होऊन उर्ध्व नगर, नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्याचे चिन्ह सध्या तरी दिसत नाही. भंडारदरा 5.5 टिएमसी पाणीसाठा आहे. हे धरण 52 टक्के आहे. निळवंडेत 4 टिएमसी पाणीसाठा आहे. म्हणजेच 51 टक्के तर मुळा 12 टिएमसी म्हणजेच 47 टक्के पाणीसाठा आहे. पावसाने जोर धरल्याने धरणं भरण्याची सुचिन्ह दिसत आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील धरणांतुन ओव्हरफ्लो जावु शकेल असे सध्यातरी दिसते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com