दारणाच्या पाणलोटात पावसाचे पुनरागमन
सार्वमत

दारणाच्या पाणलोटात पावसाचे पुनरागमन

दारणा 60.71, भावली 77.5 टक्के तर गंगापूर 52.22 टक्के

Arvind Arkhade

अस्तगाव|वार्ताहर|Astgav

गेल्या तीन आठवड्यांपासून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाने विश्रांती घेतली होती. कालपासून पावसाने दारणाच्या पाणलोटात दमदार पुनरागमन केले आहे. काल दुपारनंतर मुसळधार पावसाने घाटमाथा चिंब झाला आहे.

मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचे आगमन झाले आहे. दारणा धरणाच्या पाणलोटातील इगतपुरी, घोटी भागात काल दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला. कालही दुपारी मध्यम पाऊस झाला होता. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 13, घोटी येथे 38, इगतपुरी येथे 65 मिमी पाऊस झाला. त्यामुळे काल सकाळी 6 वाजेपर्यंत दारणात 31 दलघफू नवीन पाणी दाखल झाले होते.

7149 दलघफू क्षमतेच्या दारणात 4340 दलघफू पाणीसाठा झाला आहे. म्हणजेच दारणा 60. 71 टक्के भरले आहे. मागील वर्षी कालच्या तारखेला दारणा 74 टक्के भरलेले होते. दारणा जवळील भावली या धरणाच्या पाणलोटात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 60 मिमी पावसाची नोंद झाली. या धरणात 21 दलघफू नवीन पाणी दाखल झाले.1456 क्षमतेच्या भावलीत 1111 दलघफू साठा तयार झाला आहे.

हे धरण 77.51 टक्के भरले आहे. मागील वर्षी कालच्या तारखेला भावलीत 83.26 टक्के पाणीसाठा तयार झालेला होता. या धरणाच्या पाणलोटात पाऊस लागून राहिल्यास हे धरण लवकरच ओव्हरफ्लो होईल. काल दुपारीही या धरणांच्या पाणलोटात जोरदार पाउस झाला.

गंगापूर धरणांच्या काल दिवसभर पावसाचा थेंबही नव्हता. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत त्र्यंबक येथे 3 मिमी पाऊस नोंदला गेला. अन्यत्र पाउस नाही.5630 क्षमतेच्या गंगापूर धरणाचा साठा 2940 दलघफू इतका आहे. हे धरण 52.22 टक्क्यांवर स्थिर आहे. मागील वर्षी कालच्या तारखेला गंगापूरमध्ये 56 टक्के पाणीसाठा तयार झालेला होता. गंगापूर धरण समूहात पावसाने अजून पुनरागमन केलेले दिसत नाही. समूहातील कश्यपी 24.46 टक्के, गौतमी गोदावरी 21.09 टक्के, अशी धरणांची स्थिती आहे.

गोदावरीत 404 क्युसेकने पाणी

नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या पाणलोटातही पावसाचे प्रमाण मध्यम स्वरुपाचे असल्याने गोदावरीतील विसर्ग 404 क्युसेकने सुरू आहे. काल सकाळी या बंधार्‍याच्या भिंतीजवळ 51 मिमी पावसाची नोंद झाली. निफाड, नाशिक परिसरात बुरबूर स्वरुपाचा पाऊस काल होता. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात मात्र दमदार पाऊस बरसत आहे.

लाभक्षेत्रात दोन इंच पाऊस

काल सकाळी संपलेल्या 24 तासांत गोदावरीच्या कालव्यांवरील पाऊस असा- देवगाव 60, ब्राम्हणगाव 48, कोळगाव 51, पढेगाव 50, सोमठाणा 60, सोनेवाडी 51, शिर्डी 36, राहाता 56, रांजणगाव 48, चितळी 64, असा पाऊस नोंदला गेला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com