दर्गाह जमीन खरेदी विक्री प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशीची मागणी

इनाम जमीन विक्री प्रकरण : वाद सुरू असतानाही एका फ्लॅटची विक्री
दर्गाह जमीन खरेदी विक्री प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशीची मागणी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहरातील अत्यंत महागड्या भागात असणार्‍या नवीन नगर रस्त्यावरील ताजणे मळा परिसरातील दर्गाह जमीन खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार बेकायदेशीर असल्याने या गंभीर प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी पीर फखरुउल्लाह शह बाबा दर्गाह मुख्य विश्वस्त शेख गफ्फार अब्दुल लतीफ यांनी वक्फ बोर्डाकडे केली आहे. या वादाने गंभीर रूप धारण केलेले असतानाही गेल्या काही दिवसांपूर्वी या जागेतील एका फ्लॅटची विक्री करण्यात आली आहे. यामुळे खरेदी-विक्री करणारे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

शहरातील ताजणे मळा येथील चार एकर सतरा गुंठे जागेची खरेदी विक्री चर्चेत आली आहे. इनाम जमिनीला कूळ लागत नसतानाही शहरातील एका परिवाराने कूळ दाखवून बेकायदेशीररित्या इनाम जमिनीची विक्री केली आहे. शासन आदेश डावलून ही जमीन कोट्यवधी रुपयांना विकण्यात आली आहे. ताजने मळा लगत 4 एकर 17 गुंठे जमीन गेल्या काही वर्षांपासून वादाच्या भोवर्‍यात अडकली आहे. ही जागा अत्यंत मोक्याच्या भागात आहे. या जागेच्या खरेदी विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे.

ही जागा मीर फकूर उल्लाह शाह बाबा दर्गाह साठी इनाम देण्यात आली होती. या जागेवर 1954 सालापासून पीर दर्गाह अस्तित्वात आहे. या दर्गासाठी ही जागा इनाम म्हणून देण्यात आलेली आहे . शासनाच्या नियमाप्रमाणे इनाम जागेवर कूळ लागत नाही. असे असतानाही एका परिवाराने जमिनीची खरेदी विक्री केली आहे. सक्षम अधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय जागा विकता येत नाही. तसा शासनाचा अध्यादेश आहे. असे असतानाही या जागेची विक्री करण्यात आली आहे. शासनाला कोणताही नजराना न भरता इनाम जागेची खरेदी विक्री करण्यात आली आहे.

दरम्यान या दर्ग्याचे मुख्य विश्वस्त लतीफ यांनी या जागेचा जोरदार पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांनी मुस्लिम बोर्डाकडे या जागेच्याा खरेदी-विक्री व्यवहाराची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. दर्ग्याच्या इनाम वर्ग 2 जागेच्या बेकायदा व्यवहार व अफरातफर करण्यामध्ये शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या हात गुंतले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. अशी जागा जर पालिका हद्दीत असेेल तर त्याला कूूळ कायदा लागू होत नाही असेे लतीफ यांचे म्हणणे आहे. त्यांनी या जमीन व्यवहाराची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.

हा वाद सुरू असतानाही काही दिवसांपूर्वी या जागेतील एका फ्लॅटची विक्री करण्यात आली आहे. याबाबत आक्षेप घेण्यात आल्याने हा खरेदी व्यवहारही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रांताधिकार्‍यांनी या जागेतील सर्व मालमत्ताधारकांना नोटीस पाठवून आपले म्हणणे मांडण्यासाठी याच महिन्यात बोलावले आहे. कायदेशीर खर्च करण्यासाठी जमिनीची विक्री करणार्‍या एकाने संबंधित मालमत्ताधारकांकडून पैशांची मागणी केली आहे. यामुळे या मालमत्ताधारकांनी संताप व्यक्त केला आहे. हे मालमत्ताधारक न्यायालयात जाण्याच्या मनस्थितीत असल्याने या जमिनीची बेकायदेशीर खरेदी-विक्री करणारा परिवार चांगलाच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.