
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काल सायंकाळी पावसाचे आगमन झाले. गंगापूरच्या पाणलोटातील अंबोली परिसरात 34 मिमी पावसाची नोंद झाली. दारणाच्या पाणलोटात काल सायंकाळी 5.30 वाजेनंतर पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. नाशिक शहरात अर्धातास जोरदार पाऊस झाला.
दारणा तसेच गंगापूरच्या पाणलोटात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. काल बुधवारी सायंकाळी 5.30 ते 6 वाजेपर्यंत दारणाच्या भिंतीजवळ 3 मिमी पावसाची नोंद झाली होती. गंगापूरच्या पाणलोटातील त्र्यंबकला 12 मिमी तर अंबोली येथे 34 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूरच्या भिंतीजवळ 25 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर धरणाच्या खाली पावसाने नाशिक शहरासह परिसरात दमदार हजेरी लावली.
पाऊस पडता झाल्याने पाणलोटासह लाभक्षेत्राला दिलासा मिळाला आहे. बुधवारी सकाळी 6 पर्यंत मागील संपलेल्या 24 तासांत वाकीला 2 मिमी (1 जून पासून एकूण 40 मिमी), भाम ला 5 मिमी (एकूण 32 मिमी), भावलीला 19 मिमी (एकूण 173 मिमी), इगतपुरीला 3 मिमी (75 मिमी), त्र्यंबकला 6 मिमी (26 मिमी), असा पाऊस नोंदला गेला.
लाभक्षेत्रात पाऊस !
काल सायंकाळी सहा वाजेनंतर गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील काही गावांमध्ये पावसाच्या हलक्या सरींचे आगमन झाले. अस्तगाव परिसरात पहिल्यांदाच पावसाने बर्यापैकी हजेरी लावली. राहाता, शिर्डी भागात केवळ शिडकावा झाला. लाभक्षेत्रात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या असल्याने एक दोन दमदार पावसांची गरज असून यावर्षी पावसा अभावी पेरण्या लांबल्या आहेत.