अवघ्या 24 तासात दारणात आले एवढे पाणी...
सार्वमत

अवघ्या 24 तासात दारणात आले एवढे पाणी...

विसर्ग : दारणा 1250, भावली 701 तर गोदावरीत 3155 क्युसेक

Arvind Arkhade

अस्तगाव|वार्ताहर|Astgav

नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती. दरम्यान काल सकाळी संपलेल्या 24 तासांत दारणात 683 दसलक्ष घनफूट पाणी नव्याने दाखल झाल्याने हे धरण सकाळी 81.37 टक्के भरले होते.

दारणातून काल 1250 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. हे पाणी खाली नांदूरमधमेश्वरच्या दिशेने वाहत आहे. नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत 3155 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. तर भावली धरणातूनही 701 क्युसेकने विसर्ग दारणाच्या दिशेने सोडण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या परिसरात काहिसा दिलासादायक पाऊस दोन दिवसांपासून पडत आहे. काही ठिकाणी पावसाला जोर नसला तरी पडता झाल्याने धरणांच्या जलाशयात पाणी वाढेल अशी आस लागून आहे. गोदावरी कालव्यांच्या संदर्भातील धरणे पावसळ्यापूर्वीच निम्मी भरलेली होती. पावसाने महिना दीड महिना विश्रांती घेतल्याने धरणांच्या पाणलोटाला पावसाची प्रतिक्षा होती.

मात्र मंगळवार पासून पावसाने दिलासादायक स्थिती निर्माण केली आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 49 मिमी, घोटीला 36, इगतपुरीला 46 मिमी पावसाची नोंद झाली. हा मध्यमस्वरुपाचा पाऊस आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने इगतपुरी व घाट माथ्यावरील पाणी काल सकाळपर्यंत चांगल्या प्रकारे दारणात वाहुन आले.

24 तासात दारणात 683 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. त्यामुळे 7149 दलघफू क्षमतेच्या दारणात 5817 दलघफू पाणी साठा झाला आहे. हा साठा 81.37 टक्के इतका आहे. 24 तासांत 10 टक्के पाणी दारणात दाखल झाले. धरण 80 टक्क्यांच्या पुढे गेल्याने यातून विसर्ग सुरु झाला आहे. दारणाच्या जलविद्युत प्रकल्पाच्या गेट मधून 1100 क्युसेकने तर 150 क्युसेक मुख्य गेट मधून लिकेजच्या रुपात बाहेर पडत आहे.

काल दिवसभर भावलीच्या पाणलोटात पावसाची संततधार सुरु होती. भावली पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणाच्या सांडव्यावरुन 701 क्युसेकने विसर्ग सुरु होता. 24 तासांत 46 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. भावलीला काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासांत 83 मिमी पावसाची नोंद झाली. एक जून पासुन तेथे 2033 मिमी पावसाची नोंद झाली. भावलीतील विसर्ग खाली दारणाच्या दिशेने सुरु झाला आहे.

गंगापूर धरणाचा काल सकाळी 6 वाजता साठा काहीसा वाढवून तो 52.66 टक्के इतका झाला. 24 तासांत गंगापूरला 34, त्र्यंबकला 23, अंबोलीला 43 मिमी पावसाची नोंद झाली. काल सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत गंगापूरच्या पाणलोटात मध्यम पाऊस झाला. 12 तासांत गंगापूरला 25, त्र्यंबकला 40, अंबोलीला 15 मिमी पावसाची नोदं झाली.

तर कश्यपीला काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 36, गौतमी ला 34, तर काल दिवसभर 12 तासांत कश्यपीला 7 मिमी, व गौतमीला 19 मिमी पावसाची नोंद झाली. 5630 क्षमतेच्या गंगापूरमध्ये 2965 दलघफू पाणीसाठा आहे. 24 तासांत गंगापूरमध्ये 34 दलघफू, कश्यपीत 09 दलघफू, गौतमीत 17 दलघफू नविन पाणी दाखल झाले.

नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या पाणलोटातील निफाड भागात जोरदार पाऊस बुधवारी झाल्याने ते पाणी तसेच रात्रीतून दारणातील पाणी पोहचल्याने या बंधार्‍यातून बुधवारी संध्याकाळी 10 वाजता 3155 क्युसेकने विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली. विसर्ग काल सायंकाळी 5 पर्यंत टिकुन होता.

नंतर तासाभरात निफाड भागातील पाण्याची आवक कमी होत गेल्याने गोदावरीतील विसर्ग सायंकाळी 6 वाजता 1614 क्युसेक वर आणण्यात आला. दारणाचे विसर्गात सलगता राहु शकते त्यामुळे आता गोदावरी वाहती राहु शकते. हे पाणी जायकवाडीकडे वाहत असल्याने या जलाशयाचा साठ्यात भरच पडणार आहे.

अन्य धरणांचे साठे असे- पालखेड 43.39 टक्के, कडवा 32 टक्के, मुकणे 31.65 टक्के, भोजापूर 42.38 टक्के, आळंदी 0.87 टक्के, कश्यपी 25.54 टक्के, वालदेवी 37.64 टक्के, गौतमी गोदावरी 22.16 टक्के, वाकी 13.4 टक्के, भाम 46.84 टक्के.

गोदावरी कालव्यावरील काल सकाळी संपलेल्या 24 तासांतील पाऊस असा- नांदूरमधमेश्वर 48, देवगाव 50, ब्राम्हणगाव 26, कोपरगाव 46, पढेगाव 65, सोमठाणा 6, कोळगाव 11, सोनेवाडी 7, शिर्डी 22, राहाता 12 मिमी असा पाऊस नोंदला गेला.

जायकवाडी 55 टक्के !

काल सकाळच्या आकडेवारी नुसार जायकवाडी जलाशयात अर्धा टिएमसीहुन अधिक पाणी 24 तासांत दाखल झाले. त्यामुळे उपयुक्त साठा 42.2 टिएमसी इतका झाला आहे. म्हणजेच 55.07 टक्के साठा तयार झाला आहे. मृतसह एकूण साठा 68.2 टिएमसी म्हणजेच 66.47 टक्के झाला आहे. एक जून पासुन 18.2 टिएमसी नविन पाणी या जलाशयात दाखल झाले आहे. आता गोदावरीतूनही विसर्ग सुरु झाला. दोन दिवसानंतर हे पाणी जायकवाडीच्या बॅक वॉटरमध्ये दाखल होणे सुरु होईल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com