दारणा 60 टक्के; विसर्ग सुरू

गोदावरीत 6310 क्युसेकने विसर्ग, गंगापूर निम्मे भरण्याच्या मार्गावर
File Photo
File Photo

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

दारणाच्या पाणलोटातील मुसळधार पावसाने दारणाचा साठा 60.25 टक्क्यांवर पोहचला आहे. पाणलोटातील इगतपुरी येथे विक्रमी 242 मिमी पाऊस 24 तासांत झाला. दारणा पाठोपाठ गंगापूर धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर आहे. भावली धरणाच्या पाणलोटातही 231 मिमी पावसाची नोंद झाली. काल सकाळी या धरणाचा साठा 58.72 टक्क्यांवर होता. आज हे धरण 65 टक्क्यांवर पोहचणार आहे.

दरम्यान दारणातून काल रविवारी सकाळी 6 वाजता 500 क्युसेकने पाणी सोडण्यात सुरू झाले आहे. त्यानंतर पाण्याची आवक वाढल्याने सकाळी 10 वाजता 1500 क्युसेक करण्यात आला. तासाभरात 11 वाजता 2500 क्युसेक करण्यात आला. नंतर दुपारी 1 वाजता 3860 क्युसेक तर सायंकाळी 4 वाजता तो 5688 क्युसेक करण्यात आला. हा विसर्ग दारणा नदीतून गोदावरीत दाखल होत असल्याने नांदूर मधमेश्वर बंधार्‍यात पाण्याची आवक वाढल्याने काल सकाळी 8 वाजता 3228 क्युसेकने सुरू असलेला या बंधार्‍यातील गोदावरीत पडणारा विसर्ग 6310 क्युसेकवर नेण्यात आला. तो काल दिवसभर स्थिर होता. हे पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहू लागले आहे.

काल दिवसभर अधूनमधून पावसाच्या दमदार सरी बरसत होत्या. त्यामुळे घाटमाथ्यावरील पाणी वेगाने धरणाच्या साठ्यात सामावत आहे. दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी, घोटी परिसरात जोरदार पावसाचे तांडव सुरू आहे. काल सकाळी मागील संपलेल्या 24 तासांत इगतपुरीला 242 मिमी विक्रमी पाऊस झाला. दारणाच्या भिंतीजवळ 34 मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने दारणात 24 तासांत 1 टीएमसी पाणी दाखल झाले.

त्यामुळे दारणाचा साठा 60.25 टक्क्यांवर पोहचला होता. 7149 क्षमतेच्या या धरणात 3248 दलघफू म्हणजेच सव्वा तीन टिएमसी पाणीसाठा झाला आहे. शेजारील भावलीला 231 मिमी पावसाची नोंद झाली. या धरणात 24 तासात 205 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. 1434 दलघफू क्षमतेच्या भावलीत 842 दलघफू पाणीसाठा काल सकाळी होता. हे धरण 58.72 टक्के भरले आहे. आज सकाळपर्यंत या धरणात 63 टक्क्यापर्यंत साठा होऊ शकतो. 100 टक्के भरल्यानंतर या धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू होईल. ते दारणाच्या दिशेने धावेल.

गंगापूर धरणाच्या पाणलोटातही काल दिवसभरात अधूनमधून पावसाच्या सरी दाखल होत होत्या. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत गंगापूरच्या भिंतीजवळ 76 मिमी, पाणलोटातील त्र्यंबकला 94 मिमी, अंबोलीला 92 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे 24 तासात गंगापूरमध्ये 520 दलघफू म्हणजेच अर्धा टीएमसी पाणी दाखल झाले. त्यामुळे गंगापूर धरण 45.31 टक्के झाले. 5630 क्षमतेच्या या धरणात 2551 दलघफू पाणीसाठा झाला आहे. गेल्या तीन दिवसांत या धरणात 1 टिएमसी नवीन पाणी दाखल झाले. पावसाचा जोर टिकून राहिल्यास आज सोमवारी गंगापूर निम्याहून अधिक होईल. काल रविवारी सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंत 11 तासात गंगापूरच्या भिंतीजवळ 28 मिमी, त्र्यंबकला 15 मिमी, अंबोलीला 21 मिमी, कश्यपीला 26 मिमी, गौतमीला 36 मिमी, असा पाऊस नोंदला गेला.

अन्य धरणांचे कालचे साठे- मुकणे 48.74 टक्के, वाकी 5.86 टक्के, भाम 28 टक्के, वालदेवी 12.09 टक्के, कश्यपी 26.78 टक्के, गौतमी गोदावरी 32.39 टक्के, कडवा 52.78 टक्के, आळंदी 23.77 टक्के, पालखेड 48.55 टक्के पाणी साठा झाला आहे.

पाऊस असा- मुकणे 62 मिमी, वाकी 101 मिमी, भाम 96 मिमी, वालदेवी 42 मिमी, कश्यपी 83 मिमी, गौतमी 77 मिमी, कडवा 50 मिमी, आळंदी 65 मिमी, गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील काल सकाळी नोंदलेला पाऊस असा- देवगाव 17 मिमी, ब्राम्हणगाव 7 मिमी, कोपरगाव 14 मिमी, पढेगाव 15 मिमी, सोनेवाडी 12 मिमी, शिर्डी 6 मिमी, राहाता 16 मिमी, रांजणगाव 9 मिमी, चितळी 13 मिमी पावसाची नोंद झाली.

गोदावरीतील विसर्ग वाढला

नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या वरील बाजूस चांदोरी, सायखेडा भागात तसेच नाशिक शहरातील पावसाचे पाणी आणि दारणातून सोडलेला विसर्ग यामुळे काल सकाळी या बंधार्‍यातून सुरू असलेल्या 3228 क्युसेकचा विसर्ग काल सकाळी 8 वाजता 6310 क्युसेक करण्यात आला. त्यामुळे गोदावरीतील पाणी पातळी हळुहळु वाढू लागली आहे. हे पाणी जायकवाडीच्या दिशेने जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com