दारणा 65, भावली 84 टक्क्यांवर

दारणा 65, भावली 84 टक्क्यांवर

अस्तगाव|वार्ताहर|Astgav

काल सकाळी संपलेल्या 24 तासांत दारणाच्या जलाशयात 85 दलघफू नविन पाणी दाखल झाले. दारणाच्या पाणलोटातील इगतपुरीला 44, घोटीला 14 मिमी पावसाची नोंद झाली. भावलीला 83 मिमी पावसाची नोंद झाली. या धरणात 24 तासांत 61 दलघफू नविन पाणी दाखल झाले. दारणाचा पाणी साठा 65.37 टक्के तर भावलीचा पाणी साठा 84.18 टक्के इतका झाला आहे.

काल दिवसभर दारणा, गंगापूरच्या पाणलोटात पावसाने उघडीप दिली होती. मात्र काल संपलेल्या 24 तासांत मध्यमस्वरुपाचा पाऊस नोंदला गेला. गेल्या वर्षी 25 जुलैपर्यंत धरणातून विसर्ग सुरू झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाची स्थिती फार समाधानकारक नाही त्यामुळे धरणांच्या पाणलोटात धुव्वाधार पावसाची गरज आहे.

7149 दलघफू क्षमतेच्या दारणात 4673 दलघफू पाणीसाठा आहे. 65 टक्क्यांपर्यंत हे धरण पोहचले आहे. भावली 85 टक्क्यांपर्यत पोहचले आहे. हे धरण 100 टक्के भरल्यानंतर त्याच्या सांडव्यावरुन विसर्ग सुरू होतो. पावसाचे दमदार आगमन झाल्यास सर्वात आगोदर या प्रकल्पातून विसर्ग सुरू होतो. गंगापूर धरणाची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. या धरणाचा साठा 52.22 टक्क्यांवर स्थिर आहे.

काल सकाळी संपलेल्या 24 तासांत गंगापूरला 30, अंबोलीला 25 मिमी पावसाची नोंद झाली. काल सकाळी 6 ते सायंकाळी 6 या 12 तासांत केवळ अंबोलीला 6 मिमी पावसाची नोंद झाली. अन्यत्र पावसाचा थेंबही नाही. 5630 क्षमतेच्या 2940 दलघफू इतका पाणीसाठा आहे. नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत 807 क्युसेकने विसर्ग सुरू होता.

गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत देवगावला 15 मिमी, सोमठाणा 9 मिमी, रांजणगाव 3 मिमी, चितळी 21 मिमी या व्यतिरिक्त अन्यत्र पाऊस निरंक आहे. अन्य धरणांचे साठे असे- कडवा 21.74 टक्के, मुकणे 28.10 टक्के, भोजापूर 24.10 टक्के, आळंदी 0.58 टक्के, कश्यपी 24.73 टक्के, वालदेवी 34.20 टक्के, गौतमी गोदावरी 21.25 टक्के, वाकी 6 टक्के, भाम 32.15 टक्के.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com