द्राक्ष बागांना अवकाळीचे ग्रहण

द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल
द्राक्ष बागांना अवकाळीचे ग्रहण

कोळपेवाडी (वार्ताहर) -

द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना यावर्षी खराब हवामानाचा फटका बसत आहे. द्राक्षबागा काही दिवसांनी काढणीला येणार आहेत मात्र

अवकाळी पावसामुळे द्राक्षांच्या मण्यांना तडे जात आहे. निर्यातक्षम द्राक्ष निम्म्यावर येणार आहे. लाखो रुपये केलेला खर्च तरी निघणार का?अशी चिंता पडलेले द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मागील वर्षी कोरोना संकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना बसला. द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांकडे येणारे द्राक्षाचे व्यापारी द्राक्ष खरेदीसाठी फिरकलेच नाही. कोरोना संकटाची भीती न बाळगता परदेशात जाणारी द्राक्ष शेतकरी दहा रुपये किलो दराने रस्त्यावर विकत होता. तरीदेखील मोठ्या प्रमाणात द्राक्ष शिल्लक राहिल्यामुळे केलेल्या लाखो रुपये खर्चापैकी काही तरी पदरात पडावे यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी द्राक्ष व्यापार्‍यांना परदेशात निर्यात होणारी द्राक्ष मातीमोल भावात विकली. मागील काही महिन्यापासून देशात व राज्यात करोनाचा जोर ओसरत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी सुखावला होता. मात्र अवकाळी पाऊस, बदलेले हवामान द्राक्षांच्या मुळावर उठले आहे. पडणारा पाऊस द्राक्षांच्या घडामध्ये साचून गारवा वाढल्यामुळे द्राक्षांच्या मण्यांना तडे जात आहे. परदेशात जाणारी हि द्राक्ष 100 ते 120 रुपये किलो दराने व्यापार्‍यांनी सहज खरेदी केली असती मात्र मण्यांना तडे जात असून हे प्रमाण वाढत जावून दर निम्म्यावर येणार आहे. त्यामुळे यावर्षी देखील काही पदरात पडेल याची शाश्वती नसल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी सुधाकर दंडवते यांनी म्हटले आहे. कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील धामोरी, चास, रवंदे, शहाजापूर, कारवाडी, मंजूर, हंडेवाडी, वेळापूर, सांगवी भुसार, वडगाव, बक्तरपूर आदी गावात अंदाजे 100 ते 150 हेक्टर क्षेत्र द्राक्ष बागाचे आहे. मामा जंबो, सुधाकर, माणिक चमन, सुपर सोनाका, थॉमसन आदी वाणांचे द्राक्ष उत्पादन घेतले जाते. नवीन द्राक्ष बागासाठी पहिल्या वर्षी अंदाजे पाच लाख रुपये खर्च येतो.दुसर्‍या वर्षी घड निर्मिती होवून परिपक्व माल तयार होण्यासाठी दोन लाख रुपये खर्च येतो. पहिल्या वर्षी अंदाजे 100 ते 150 क्विंटल माल निघतो. वेळच्यावेळी लाखो रुपयांच्या औषध फवारण्या कराव्या लागतात. केलेला खर्च वाया जावू नये म्हणून शेतकरी पाऊस, थंडी तसेच गारपीठ साठी स्वतंत्र विमा काढतात. मात्र विमा कंपन्या हवामान केंद्रावर पावसाची नोंद झाली तरच नुकसान भरपाई देतात. अनेकवेळा द्राक्ष बागांचे पावसामुळे नुकसान होवून देखील हवामान केंद्रावर पावसाची नोंद होत नसल्यामुळे शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित राहत आहे हि द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची शोकांतिका आहे. विमा कंपन्यांनी जास्तीत जास्त प्रतिनिधी नेमून हे प्रतिनिधी शेतकर्‍यांच्या बांधावर जावून पाहणी करून अहवाल सादर केल्यास शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळू शकते त्यासाठी विमा कंपन्यांनी मानसिकता बदलावी व हवामान केंद्रांची संख्या वाढवावी यासाठी केंद्र व राज्य शासनाने दखल घ्यावी अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com