
अकोले |प्रतिनिधी| Akole
तालुक्यातील खडकी व शिसवद येथील बंधार्यावरील ढापे चोरी प्रकरणी राजूर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन महिंद्रा बोलेरो कंपनी च्या पिकअप तसेच एक ऑक्सीजन गॅस ची टाकी, एच पी कंपनीची घरगुती वापराची गॅसची टाकी, गॅसकटर, लोखंडी कटर असा एकुण 12 लाख 14 हजार रुपये मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
दि. 12 सप्टेंबर 2022 रोजी रात्रीच्या दरम्यान खडकी येथील बंधार्यावरुन 80 लोखंडी ढापे चोरीला गेले होते. त्याबाबत रामभाऊ इंदु पोरे यांनी राजूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. त्यावरुन राजूर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 200/2022 भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे दाखल केला होता.
यासंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांना सहा महिन्यापुर्वी खडकी व शिसवद येथील बंधार्यावरील ढापे हे राजाराम तातळे याने चोरले बाबत गोपनीय माहिती मिळाली. सदर माहिती तसेच तांत्रीक विश्लेषण करुन सदरचा गुन्हा हा राजाराम नारायण तातळे यांनी केल्या बाबत खात्री झाल्याने राजाराम नारायण तातळे (वय 39, रा. तातळेवाडी, बिरगावतराळे, ता. इगतपुरी) यास चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले.
सदर घटने बाबत सखोल चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेतले असता त्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याचे कबुली दिली. त्याचे साथीदार शंकर सावकार आढळ (वय 35) व ज्ञानेश्वर अनाजी बगाड (वय 22, दोघेही रा. निनावी, ता. इगतपुरी) यांना ताब्यात घेतले. त्यांनीही सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना या गुन्ह्यात अटक करुन गुन्ह्याचा पुढील तपास राजूर पोलीस करीत आहेत.
जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागिय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक जी. एफ. शेख, पोहेकॉ विजय मुंढे, पो. हे. कॉ . कैलास नेहे, पो. ना. दिलीप डगळे, पो. ना. पटेकर, पो कॉ संभाजी सांगळे, पो. कॉ. अशोक गाढे, पो. कॉ. विजय फटांगरे, पो कॉ सुनिल ढाकणे, पो. कॉ. साईनाथ वर्पे, पो. कॉ. अशोक काळे, अपर पोलीस अधिक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील नेमणुकीचे पो. ना. फुरकान शेख यांनी ही धडक कारवाई केली आहे.