
राहाता | Rahata
मान्सुनला परतीचे वेध लागले आहेत. सर्वसाधारणपणे 17 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान मान्सून भारतातून माघारी जातो. यावर्षी थोड्या विलंबाने म्हणजे 25 सप्टेंबरपासून राजस्थानातून माघारीला सुरुवात झाली असून महाराष्ट्रातून 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सून माघारी जाईल. राज्यभरात ऑगस्ट कोरडा गेल्यानंतर सप्टेंबरमध्ये पाऊस झाला. धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालेली दिसून येत असली तरी लाभक्षेत्रात भूजलपातळीत फारसी वाढ झालेली नाही.
एकीकडे कोरड्या पडलेल्या विहिरी, हातातून गेलेली खरीप पिके, राज्यात झालेला पावसाचा दीर्घ खंड या पार्श्वभूमीवर केवळ खात्री नसलेल्या परतीच्या पावसावर अवलंबून राहावे असे वातावरण दिसत नाही.
मार्च 2024 पर्यंत अल निनो सक्रिय राहणार असल्याने ऑक्टोबर हिट तीव्र असेल. हिवाळ्यातील थंडीचे प्रमाण कमी राहील. तापमान वाढल्याने डिसेंबरनंतर चक्रीय वादळाचा प्रभाव वाढून अवकाळी पाऊस पडेल.
पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात कमीजास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे सध्या नाशिक नगर मधील मुळा धरण समुहात 19.10 टीएमसी (88 % ), भंडारदरा धरण समुहात 20.10 टीएमसी (100%), गंगापूर धरण समूहात 9.35 टीएमसी (100 %), दारणा धरण समुहात 23.80 टीएमसी (98 %) आणि पालखेड धरण समुहात 11.20 टीएमसी (97%) उपयुक्त पाणीसाठा आहे .
जायकवाडी धरणात सध्या 36.55 टीएमसी (47.27%) जिवंत पाणीसाठा आहे. दि. 1 जुन पासुन जायकवाडीत 24 टीएमसी पाण्याची आवक झाली असून पूर्वीचा 19 टीएमसी पाणीसाठा जमेस धरुन जिवंत पाणीसाठा 43 टिएमसी (56.57%) झालेला आहे. सध्या जायकवाडीत 3400 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. ओझर बंधार्यावरुन 1200 क्युसेक्स पाणी प्रवरेत व व नांदुर मधमेश्वर बंधार्यावरुन 1000 क्युसेक्स पाणी गोदावरी नदीत प्रवाहीत होत आहे.
समन्यायी कायद्यानुसार जायकवाडीतील जिवंत पाणी साठा 65% म्हणजे 49.80 टीएमसी अपेक्षित आहे. जायकवाडीतील जिवंत पाणीसाठा 65% असेल तेंव्हा मुळा धरण समुहात 17.30 टीएमसी (79%), प्रवरा धरण समुहात 17.70 टीएमसी (88%), गंगापूर धरण समूहात 8.99 टीएमसी (93 %), दारणा धरण समुहात 21.30 टीएमसी (102%) आणि पालखेड धरण समुहात 9 टीएमसी (82%) इतकाच पाणीसाठा असायला हवा. सध्या या टक्केवारी पेक्षा जास्त पाणी नगर नाशिक मधील उपरोक्त धरणात अडवले गेले असल्याने जायकवाडीत पाणी सोडण्याची मागणी होऊ लागली आहे. जायकवाडीत 65% म्हणजे 49.80 टीएमसी पाणी साठा होण्यासाठी आजमितीला 7 टीएमसी पाणी कमी आहे. (खरीपातील पाणी वापर पाहाता)
उपरोक्त आकडेवारी नुसार मुळा धरण समुहात 1.70 टीएमसी, प्रवरा धरण समुहात 2.30 टीएमसी, गंगापूर धरण समूहात 0.40, दारणा धरण समुहात 0.50 आणि पालखेड धरण समुहात 2.20 टीएमसी असे एकुण 7.10 टीएमसी पाणी जादा अडविले गेल्याचे दिसत आहे. खरीप हंगामात नाशिक नगर जिल्ह्यात जवळपास 8 टीएमसी तसेच जायकवाडी मध्ये 7टीएमसी पाणी वापरले गेले आहे.
गोदावरी नदीवरील नांदुर मधमेश्वर बंधार्यावरुन 16.50 टीएमसी तसेच प्रवरेच्या ओझर बंधार्यावरुन 3 टीएमसी पाणी वाहुन गेले आहे. जायकवाडी फुगवट्यानजीक गोदावरी नदीवरील कमालपूर बंधार्यातून 20 टीएमसी तर प्रवरेच्या नेवासा येथील मधमेश्वर बंधार्यातून 2.50 टीएमसी वाहुन गेल्याची नोंद झाली आहे.
दि.15 आक्टोबर रोजी खरीपात वापरलेल्या पाण्यासह जायकवाडी तसेच नगर व नाशिकच्या संबधित धरणांमधील पाण्याचा ताळेबंद अंतिम केला जाऊन आक्टोबर अखेरीपर्यंत अंमलबजावणी पूर्ण केली जाऊ शकते. सध्याच्या पाणी साठ्यानुसार नाशिक मधुन 3 तसेच नगर मधुन 4 टीएमसी पाण्याची मागणी होऊ शकते. अर्थात 15 आक्टोबर पर्यंत पाणी साठ्यात वाढ झाली तर यात बदलही होऊ शकतो.
नाशिक जिल्ह्यात पाऊस थांबल्याने दारणा, गंगापूर धरणांचे विसर्ग बंद झाले आहेत. नांदूर मधमेश्वर बांधार्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत अवघा 434 क्युसेकने विसर्ग सुरु होता. निळवंडे धरणातून 350 क्युसेक, तर ओझर बांधार्यातून 1895 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. दरम्यान, नांदूर मधमेश्वर धरण विसर्ग काल रात्री 10 वाजता बंद करण्यात आला आहे.
मेंढेगिरी अहवालात पाच वर्षांनंतर पुनर्विलोकन करणेबाबत सूचित करण्यात आले आहे. परंतु अद्याप या अहवालाचे पुनर्विलोकन झालेले नाही. शासन स्तरावर याबाबत कार्यवाही होणे अत्यंत गरजेचे आहे. अहवालात नगर नाशिक मधील धरण साठे वन स्टेप अप करण्याची तरतूद आहे. याप्रमाणे जर अंमलबजावणी केली तर आजमितीला नाशिक, नगर मधील धरण साठे पाहता या धरणांतून पाणी सोडण्याची गरज नाही.
- उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा