धरणक्षेत्रात पावसाचे पुनरागमन, विसर्ग वाढले

दारणाचे गेट पुन्हा उघडले, गोदावरीतील विसर्ग 28930 क्युसेकवर
धरणक्षेत्रात पावसाचे पुनरागमन, विसर्ग वाढले

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचे परवा संध्याकाळी व काल चांगलेच आगमन झाले. त्यामुळे दारणा, गंगापूर व अन्य धरणात नविन आवक सुरू झाल्याने या दोन्ही धरणातील कमी झालेले विसर्ग पुन्हा वाढविण्यात आले आहेत.1100 क्युसेकवर आलेला दारणाचा विसर्ग काल सकाळी 6 वाजता 7244 क्युसेक इतका करण्यात आला आहे.

शनिवारी संध्याकाळी व काल रविवारी दुपारपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. दारणाच्या पाणलोटातील इगतपूरी व घोटी परिसरात जोरदार पाऊस झाला. तर गंगापूरच्या पाणलोटातही पावसाने दमदार हजेरी लावली. काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासात गंगापूरच्या पाणलोटातील अंबोली येथे 111 मिमी पावसाची नोंद झाली. त्र्यंबकला 55 मि तर गंगापुरच्या भिंतीजवळ 19 मिमी पावसाची नोंद झाली. काल दुपार पर्यंत गंगापूरच्या पाणलोटात जोरदार पाऊस झाला.

काल दिवसभरातील 11 तासात गंगापूरला 40 मिमी, त्र्यंबकला 34 मिमी, अंबोलीला 64 मिमी पावसाची नोंद झाली. काल सकाळी 6 वाजता गंगापूर मधुन 1836 क्युसेकने सुरू असलेला विसर्ग सकाळी 8 वाजता 2490 क्युसेक करण्यात आला. नंतर 10 वाजता तो 2988 क्युसेकवर नेण्यात आला. दुपारी 3 वाजता 3486 क्युसेक इतका करण्यात येत आहे. हा विसर्ग सायंकाळी उशीरा पर्यंत टिकून होता. गंगापूर मध्ये 66.12 टक्के पाणी साठा स्थिर ठेवुन नविन येणार्‍या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. 10 जुलै पासुन या धरणातुन विसर्ग करण्यात येत आहे. गंगापूर समुहातील कश्यपी 89.75 टक्के भरले आहे. त्यातुन गंगापूर च्या दिशेने 800 क्युसेकने विसर्ग सुरू होता. तर गौतमी 83.10 टक्के भरले आहे. त्यातून 500 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता.

दारणा धरणात काल सकाळी 6 वाजता 1100 क्युसेक ने विसर्ग सुरु होता. जलविद्युत केंद्रातुन सुरू होता. वक्राकार गेट बंद होते. परंतु दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी, घोटी परिसरात पुन्हा पावसाचे पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने वक्राकार गेट सकाळी 6 वाजता पुन्हा उघडण्यात आले आहे. त्यातुन 7244 क्युसेकने विसर्ग सोडणे सुरू झाले आहे. दारणाच्या भिंतीजवळ पावसाचे प्रमाण कमी असले तरी पाणलोटातील इगतपुरी व घोटी परिसरात पावसाला चांगला जोर आहे. मुकणे धरणातुनही विसर्ग सुरू झाला आहे. काल दुपारी 2 वाजता या धरणातुन 717 क्युसेक ने विसर्ग सोडण्यात आला आहे. मुकणे 88.53 टक्के भरले आहे. वालदेवीतून 341 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. आळंदीतुन 687 क्युसेक ने तर भोजापूर मधून 190 क्युसेक, पालखेड मधून 11340 क्युसेक ने विसर्ग सुरु आहे.

वरील धरणांचे पाणी तसेच निफाड तालुक्यातील ओढे नाल्यांचे पाणी नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने काल रविवारी सकाळी नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातुन जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 12507 क्युसेक ने विसर्ग करण्यात येत होता. तो दुपारी 12 वाजता 13784 क्युसेकवर नेण्यात आला. नंतर 3 वाजता 23217 क्युसेक व सायंकाळी 6 वाजता 28930 क्युसेक इतका करण्यात आला. तो स्थिर होता. यामुळे गोदावरीत कमी झालेले पाणी पुन्हा वाढले आहे.

जायकवाडी 88.89 टक्क्यांवर !

जायकवाडी जलाशयात काल रविवारी सायंकाळी 6 च्या आकडेवारी नुसार 7362 क्युसेकने आवक सुरु होती. या जलाशयात उपयुक्तसाठा 88.49 टक्क्यांवर पोहचला होता. त्यात 67.8 टिएमसी उपयुक्तसाठा तयार झाला होता. तर मृतसह एकूणसाठा 93.93 टिएमसी पयर्ंत पोहचला होता. या जलाशयात जलविद्युत केंद्रातून 1589 क्युसेक ने खाली गोदावरीत विसर्ग करण्यात येत आहे. तर उजव्या कालव्यातुन 600 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. असे एकूण 2189 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com