दुभत्या जनावरांच्या कर्ज रक्कमेत वाढ

जिल्हा बँकेकडून सभासद दूध उत्पादकांना गिफ्ट
शिवाजी कर्डिले
शिवाजी कर्डिले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत जिल्ह्यातील शेतकरी कर्जदार सभासदांना विकास सेवा सोसायटीमार्फत मोठ्या प्रमाणावर अल्प व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. शेतकर्‍यांच्या विकासाच्यादृष्टीने जिल्हा बँक नेहमीच शेतकरीभिमुख निर्णय घेत असून याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 2023-24 सालासाठी संकरीत गायी/म्हैस पशुपालन खेळते भांडवल कर्ज प्रति एक युनिटसाठी 15 हजारांवरून 20 हजार रुपये करण्यात आले आहे. हे कर्ज सभासदास 7 टक्के या सवलतीच्या व्याजदराने उपलब्ध होणार असल्याची माहीती बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.

त्याचप्रमाणे शेतकर्‍यांना दुभती जनावरे खरेदी करणेसाठी प्रति कर्जदार सभासद याप्रमाणे 2 दुभती जनावरे वरून 4 दुभती जनावरे खरेदी करणेसाठी कर्ज मर्यादा वाढण्यात आली आहे. त्यासाठी या कर्ज मर्यादा प्रती जनावर 60 हजार रुपयांवरून 75 हजार रुपये ऐवढी भरघोस वाढ करण्याचा निर्णय बँकेचे संचालक मंडळाने घेतले असल्याचीही माहीती बँकेचे चेअरमन कर्डिले व व्हाईस चेअरमन अ‍ॅड. माधवराव कानवडे यांनी दिली. दुग्धव्यवसायाद्वारे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी मोठी प्रगती केलेली आहे.

शेतकर्‍यांचा शेती पुरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय हा मुख्य व्यवसाय झालेला आहे. त्याअनुषंगाने शेतकर्‍यांचे हितादृष्टीने व बाजार भावाचा विचार करून प्रति जनावर खरेदी करण्यासाठी 15 हजारांची अशी भरघोस वाढ कर्ज मर्यादिमध्ये केली आहे. तसेच प्रती शेतकरी सभासदांसाठी 1 एकर प्रती युनिट 2 जनावरांवरून 2 एकर प्रती युनिट 4 जनावरे देणेबाबत बँकेने निर्णय घेतला असल्याची माहीती बँकेचे चेअरमन कर्डिले यांनी दिली.

याबाबत परिपत्रकाव्दारे सविस्तर माहीती जिल्ह्यातील बँकेच्या शाखांना व सर्व प्राथमिक विकास कार्यकारी सेवा संस्थांना कळविण्यात आलेली आहे. जिल्हयातील शेतकरी सभासदांनी बँकेचे शाखा किंवा प्राथमिक विकास कार्यकारी सेवा संस्थांशी संपर्क साधुन वेळेत कर्ज उपलब्ध करून घेण्याचे आवाहन बँकेचे चेअरमन कर्डिले यांनी केले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com