दुग्ध व्यवसाय शेतकर्‍यांना ठरतोय वरदान

दुग्ध व्यवसाय शेतकर्‍यांना ठरतोय वरदान

खैरी निमगाव |वार्ताहर|Khairi Nimgav

कापूस, सोयाबीन या पिकांकडे शेतकर्‍यांचा कल अधिक असताना वेगवेगळ्या कारणांमुळे या पिकातून शेतकर्‍यांना पाहिजे तसा नफा मिळत नाही. कापूस आणि सोयाबीनची आवक नसताना भावही नाही. यामुळेच शेतीसाठी जोडधंदा असलेला दुग्ध व्यवसाय सध्या शेतकर्‍यांसाठी वरदान ठरू पाहत आहे. भाव नसल्याने शेतीत नगदी पिकांनाही पर्याय म्हणून गिन्नी गवत, ऊस, घास, मका पिकाकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. सुनियोजित पद्धतीने शेतकर्‍यांसाठी मोहीम म्हणून शासनाने या व्यवसायाकडे पाहण्याची गरज आहे.

इतर पिकांच्या तुलनेने दुग्ध व्यवसाय हा 365 दिवस शेतकर्‍यांना पैसा कमावून देणारा व्यवसाय आहे. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी रोजगार निर्मिती होते व सर्वात महत्त्वाचे म्हणजे दूध हे जीवनावश्यक असल्याने आर्थिक मंदी किंवा मागील करोनासाख्या महामारीच्या काळात देखील हा व्यवसाय जोमाने सुरू होता. शेतकर्‍यांनी शेतीसोबतच दुग्ध व्यवसायाला मुख्य व्यवसाय मानले आहे.

शासनाने रोजगारासाठी लघुउद्योग म्हणून या व्यवसायाकडे बघीतले तर एक मोठी स्वतंत्र ग्रामीण अर्थव्यवस्था दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून उभी राहू शकते. रोजचे दूध व रोज पैसा शेतकर्‍यांच्या हाती खेळू लागल्यास शेतकर्‍यांची क्रयशक्ती वाढून पुढे आर्थिक सुबत्तेमुळे शेतकर्‍यांच्या इतर समस्या देखील सुटू शकतील. शेतकर्‍यांच्या हातात दुधाचा पैसा आला तर शेती खर्चासाठी शेतकर्‍यांना सावकाराच्या दारात जावे लागणार नाही.

प्रभात डेअरी (लॅक्टलिस) च्या माध्यमातून काही भागात शेतकर्‍यांना बळ देण्यास सुरुवात झाली आहे. पण शेतकर्‍यांमध्ये या व्यवसायाबाबत आणखी जागृती करण्याची गरज आहे. दुग्ध व्यवसाय हा शेतीचा जोडधंदा नसून शेतीप्रमाणेच मुख्य व्यवसाय आहे. त्याकडे मुख्य व्यवसाय म्हणूनच पाहिले पाहिजे. दुग्धव्यवसाय रुजवायचा असेल तर हवामानाला अनुकूल दुभत्या जनावरांची जात ओळखणे, त्यासाठी उत्कृष्ट जातीची संकरित दुभती जनावरे शेतकर्‍यांना उपलब्ध करून देणे, विशेष म्हणजे एका वेळेला अधिकाधिक दूध देणारी जनावरे उपलब्ध करून देणे, जनावराच्या चार्‍यावर होणारा खर्च दुग्ध व्यवसायाच्या नफा तोट्याचे समीकरण ठरवत असते.

त्यामुळे शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त हिरवा चारा आपल्या शेतात पिकवला तर चार्‍यावर होणारा अतिरिक्त खर्च कमी होतो. असे केले तरच दूध देणे शेतकर्‍यांना परवडते. नाहीतर दूध व्यवसाय देखील कापूस, सोयाबीनप्रमाणे तोट्यात जातो. त्यामुळे आज ज्या भागात दुग्ध व्यवसाय विकसित झाला, तेथे जनावरांच्या हिरव्या चार्‍याची बारमाही सोय तेथील शेतकरी करतात. त्यामुळे त्यांचा चार्‍यावर होणारा खर्च कमी होतो व पोषण आहारापुरता मर्यादित खर्च राहतो,असे केल्यास ग्रामीण भागात आर्थिक सुबत्ता येणार आहे.

दूधधंदा असणार्‍या शेतकर्‍यांना आर्थिक समस्यांचा विशेष सामना करावा लागणार नाही. आपल्याकडील संकरीत जनावरांची दूध देण्याची क्षमता इतर देशातील संकरित जनावरांच्या तुलनेने कमी आहे. त्यात भविष्यात आणखी संशोधन होणे अपेक्षित आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com