दररोजच्या पावसाने खरीप पिके धोक्यात; सोयाबीनच्या शेंगांमधून अंकूर

दररोजच्या पावसाने खरीप पिके धोक्यात; सोयाबीनच्या शेंगांमधून अंकूर

देवगड फाटा |वार्ताहर| Devgad Phata

नेवासा तालुक्यातीाल प्रवरासंगम,जळके बुद्रुक भागात गेल्या आठ दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात रोज पाऊस पडत असल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. या भागातील प्रमुख पीक सोयाबीन व कपाशी आहे. सोयाबीन पीक काढणीस येत असताना सततच्या पावसाने शेंगांमधून अंकुर बाहेर पडू लागले. कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

या निर्माण झालेल्या आसमानी संकटापुढे शेतकरी मात्र हताश झाला आहे. या खरीप हंगामातील पिकांचे पीकविमा अनेक शेतकर्‍यांनी भरले आहेत. आता विमा कंपनीकडून याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे

जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप पिकांतील सोयाबीन, उडीद, मूग, कांदा, कापूस , भाजीपाला आदी पिके जोमात आली होती परंतु गेल्या आठ दिवसांत 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर मध्ये रोज दुपारी व रात्रीच्या वेळी पाऊस पडल्याने सर्वत्र दलदल निर्माण झाल्याने त्यातच सुर्यप्रकाश नसल्याने मेहनतीने तयार केलेल्या पिकांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

या अस्मानी संकटामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास नियतीने हिसकावून घेतल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. झालेल्या अतीवृष्टीने मुरमे, प्रवरासंगम, माळेवाडी, जळके बुद्रुक, जळके खुर्द, खेडलेकाजळी, खडका या गावांत शनिवारी मध्यरात्री झालेल्या सर्वदूर मुसळधार पावसामुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे

यावर्षी शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. इतर पिकांच्या मानाने या पिकामधून बर्‍यापैकी उत्पादन मिळत असल्याची भावना शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली. मात्र यावर्षी पावसाळा सुरूवातीस पेरणी योग्य पाऊस झाल्याने अनेक भागात पेरण्या लवकर करण्यात आल्या. मात्र सोयाबीन बियाणे उगवणीमध्ये अडचणी आल्याने अनेक शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्यानंतर अधून मधून कमी अधिक प्रमाणात पाऊस होत राहिल्याने पिकांची वाढ इतर वर्षीच्या पिकापेक्षा जास्त झाली. यात अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव निर्माण झाला. यावर शेतकर्‍यांनी मात करत सोयाबीन पीक शेवटच्या टप्प्यात म्हणजेच हात लागण्याच्या अवस्थेत असताना पावसाने पुन्हा जोर केला. गेल्या आठ दिवसांपासून होत असलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे या पावसाने परिसरातील सर्व बंधारे,पाझर तलाव, ओढे, तुडूंब भरून ओसंडून वाहत आहेत.

सतत पडणार्‍या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकर्‍यांच्या आशा आता मावळल्या आहेत. या वातावरणामुळे हतबल झालेल्या शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलून मदत देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे शेतकर्‍यांमधून बोलले जात आहे.

जळके बुद्रुक येथे चराचे पाणी जवळच असलेल्या संजय जरीपटके व सत्तार शेख यांच्या शेतात घुसल्याने त्यांच्या शेतात गुडघाभर पाणी साचुन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com