दाढ बुद्रुक येथे शॉर्टसर्किटमुळे आगीत दीड एकर ऊस खाक

दाढ बुद्रुक येथे शॉर्टसर्किटमुळे आगीत दीड एकर ऊस खाक

दाढ बुद्रुक |वार्ताहर| Dadh Budruk

राहाता तालुक्यातील दाढ बुद्रूक येथे गट नंबर 617 मधील अण्णासाहेब लहानू तांबे यांच्या शेतातील दिड एकर 265 जातीचा ऊस शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत खाक झाला.

दुपारच्या वेळी ही आग लागली. त्यात संपूर्ण ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून भस्मसात झाला. या उसाच्या शेतात ठिबक सिंचन बसविले होते. ते सुद्धा आगीत खाक झाले आहे. काही शेतकर्‍यांनी आग लागताच पाण्याचा मारा केल्याने बाकीच्या ठिकाणी होणारी हानी टळली. परंतु अण्णासाहेब तांबे यांच्या उसाच्या शेजारीच फिडर असल्यामुळे आगीची भीषणता जास्त असल्याने ते काहीही करू शकले नाही. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे ही आग लागली असल्याचे शेतकर्‍यांमधून बोलले जात आहे. या डीपीची देखभाल करण्यात आली नसल्याचे शिवाजी लहानू तांबे या शेतकर्‍याने म्हटले आहे.

तोडणीला आलेला ऊस आगीत खाक झाल्याने शेतकर्‍याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. उसाला आग लागण्याचे प्रमाण यावर्षी अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी लोंबकळलेल्या विजेच्या तारा झोका घेत आहेत. उन्हाची तीव्रता वाढली असल्याने एखाद्या ठिकाणी आग लागताच क्षणार्धात होत्याचे नव्हते होऊन जाते. महावितरण अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे आर्थिक व मानसिक त्रास शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com