दाढ बुद्रुकमध्ये करोना बाधिताच्या 
संपर्कातील तिघे पॉझिटिव्ह
सार्वमत

दाढ बुद्रुकमध्ये करोना बाधिताच्या संपर्कातील तिघे पॉझिटिव्ह

31 पैकी 14 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 11 जणांचे निगेटिव्ह आले

Arvind Arkhade

दाढ बुद्रुक (वार्ताहर)- राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील पहिला 23 वर्षीय करोना बाधित रुग्ण चंद्रापूर येथील बाधिताच्या संपर्कात आला होता. त्याचा अहवाल काल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेले 31 जणांना काल तपासणीसाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. 31 पैकी 14 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 11 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्हमध्ये बाधिताच्या आईचा समावेश असून उर्वरित दोघे जण त्याच गल्लीतील रहिवासी आहेत. त्यामुळे दाढ येथील करोना बाधितांची संख्या आता 4 वर गेली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीपाद मैड यांनी दिली.

करोना बाधितांचा आकडा वाढत चालल्याने संपूर्ण दाढ बुद्रुक गाव हादरून गेले आहे. तहसीलदार कुंदन हिरे यांच्या आदेशानुसार दाढ बुद्रुक ग्रामपंचायतीने संबंधित परिसर अगोदरच कंटेन्मेंट झोन घोषित करून सील केला आहे.

सदर तरुणाचा वावर तेली गल्ली, सोनार गल्ली, सुतार गल्ली, मुस्लिम गल्ली येथे असल्याने हा परिसर 14 दिवसांसाठी सील करण्यात आला आहे. दाढ बुद्रुक गावात तीन महिने काटेकोरपणे लॉकडाऊनचे पालन यशस्वी करण्यात आले परंतु अनलॉक सुरू होताच एका तरुणाच्या हलगर्जीपणामुळे तीन महिन्यांचे प्रयत्न निष्फळ ठरून संपूर्ण गाव चिंताग्रस्त बनले आहे.

बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी घाबरून न जाता आलेल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहावे. आपला धीर खचू न देता आत्मविश्वासाने सामोरे जावे. आपले मन खंबीर असेल तर कितीही मोठे संकट परतवून लावण्याची ताकद आपले मनच देत असते.

कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास दाढ प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीपाद मैड यांनी केले आहे. या सर्व परिस्थतीवर तहसीलदार राहाता यांनी तयार केलेली नियंत्रण समिती लक्ष ठेवून आहे.

काल 31 जणांना तपासणीसाठी नेले होतेे त्यातील तीन जणांंचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सोनार गल्लीतील आणखी 11 जणांना तपासणीसाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविले असून त्यात अडीच वर्षे वय असलेल्या मुलीचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com