दाढ बुद्रुकला करोनाचे दोन बळी

खरेदीसाठी उडते ग्राहकांची झुंबड ; नियम धाब्यावर
दाढ बुद्रुकला करोनाचे दोन बळी

दाढ बुद्रुक |वार्ताहर| Dadh Budruk

राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथे करोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढत असून संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

सोमवारी दोन जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून त्यात एका तरुणाचा समावेश आहे.

गावात अनेक करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी बरेच रुग्ण होम क्वारंटाईन झालेले आहेत. नागरिकांचा निष्काळजीपणा यातून दिसून येत आहे. शासकीय नियमांचे पालन न करणे ही फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. गावात विनामास्क फिरताना अनेक ठिकाणी नागरिक दिसत आहे. मिनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री अत्यावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी अनेकांची झुंबड उडाली होती.

करोना संसर्गाला रोखण्यासाठी सामाजिक अंतर पाळणे गरजेचे आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. भाजी बाजारातही मोठ्या प्रमणावर गर्दी होत आहे. शासकीय नियमांचे पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. तसे केले तरच करोनाला आळा घालण्यात यश येईल अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. सोमवारी एक वृध्दाचा व एका तरुणाचा करोनाने बळी घेतला. एकाच दिवशी दोन बळी गेल्याने करोना संसर्ग एक चिंतेचा विषय बनला आहे.

दाढ बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत एक हजार जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीपाद मैड यांनी दिली.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णसंख्येत होणारी वाढ यामुळे ग्रामपंचायत स्तरावर दाढ बुद्रुक गाव सलग पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीनेे घेतला आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी बुधवार दिनांक 7 एप्रिल ते रविवार दिनांक 11 एप्रिल पर्यंत गाव पूर्णपणे बंद असणार आहे. त्यात स्थानिक ग्रामपंचायत निर्णयाचे बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस व शासकीय नियमानुसार संपूर्ण लॉकडाऊन (शनिवार व रविवार) हे दोन दिवस असे एकूण पाच दिवस गाव बंद असणार आहे.

- सौ. पूनम तांबे, सरपंच दाढ बुद्रूक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com