
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राज्याचे नगरविकास राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या राहुरी नगरपालिकेत सध्या चाललेय तरी काय? आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय! अशीच काहीशी अवस्था राहुरीकरांच्या बाबत झाली आहे. शहरात सुरू असलेली कामे ही अत्यंत नित्कृष्ट दर्जाची झाली असल्याच्या अनेक तक्रारी असताना सत्ताधारी ठेकेदारांना पाठीशी का घालतात? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. अनेक वेळा तक्रारींवरून कुठल्याच प्रकारची कार्यवाही होत नाही. नगरसेवकच जर ठेकेदार असतील तर सर्वसामान्य नागरीकांना काय न्याय मिळणार? असा सवाल नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते दादासाहेब सोनवणे यांनी केला आहे.
राहुरी नगरपरिषदचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात श्री. सोनवणे यांनी म्हटले, शहरातील प्रभाग 5 व 6 मध्ये काही महिन्यापूर्वीच बंदीस्त गटारीचे काम हाती घेण्यात आले. सदरचे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे झाल्याचे तक्रारी पूर्वीच करण्यात आल्या होत्या.
शहरातील गणेश मंगल कार्यालय, कासार गल्ली, कानिफनाथ चौक, राममंदिर, प्रजापिता ब्रम्हकुमारी जवळ आदी ठिकाणच्या गटारीवरील ढापे फुटल्यामुळे ढाप्याचे तुकडे व घाण जाऊन गटारी तुंबत आहेत. विद्यामंदिर प्रशालेच्या मागील बाजूस मुतारीवर दोन पाण्याच्या टाक्या भरण्याची सोय असताना पाणी कनेक्शन लिकेजमुळे अनेक दिवसांपासून टाक्या भरत नसल्याने या मुतारी स्वच्छ होत नसून रस्त्यावर मोठी दुर्गंधी पसरली आहे. प्रभाग क्र. 5 व 6 मध्ये नवीन पाईप लाईनचे काम करण्यात आले.
परंतु काम झाल्यानंतर या ठिकाणचे खड्डे बुजवून उरलेली माती, दगड यांची विल्हेवाट न लावल्याने नागरीकांना रस्त्याने चालणे मुश्कील झाले आहे. या परीसरात नियमीत साफसफाई होत नसल्याने मोठी दुर्गंधी पसरली आहे.शुक्लेश्वर चौकातील शौचालयाची स्वछता केली जात नाही. खरे हॉस्पीटल, कुलकर्णी हॉस्पीटल आदी भागातील गटार कामाला मंजुरी असुनही कामे सुरु केली जात नाही. खेडेकर हॉटेल ते प्रगती शाळा रोड डांबरीकरण काम रखडले आहे. शहरातही या पेक्षा वेगळी परिस्थिती नसून प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करुनही दखल घेतली जात नाही.
राहुरी नगरपालिकेत सध्या ठेकेदारीराज सुरु असून राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन याकडे लक्ष देऊन या ठिकाणी सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राहुरी शहरातील गटारांमधील मैला काढून तो गटाराच्या बाजूला पडून होता. त्यामुळे त्याच्या दुर्गंधीमुळे व्यापारी व नागरीक हैराण झाले होते. काल दुपारी झालेल्या दमदार पावसाच्या पाण्याने गटारीही तुंबल्या. तसेच हे मैला मिश्रित पाणी पेठेतून वाहत असताना नागरीकांना यातूनच वाट शोधत जावे लागत होते.