शिर्डी (प्रतिनिधी) -

शिर्डी नगरपंचायतद्वारे स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सायकल रॅली उत्साहात

पार पडली.

देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी केंद्र शासनाकडून संपूर्ण देशामध्ये स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. तसेच याचाच एक भाग म्हणून संपूर्ण राज्यात जल, वायू, आकाश, अग्नी, पृथ्वी या पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान सुरू झाले आहे. शिर्डी शहरात स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा अभियान गतिमान करण्यात आले आहे. शिर्डी शहराचा स्वच्छ सर्वेक्षण अभियानात अव्वल नंबर येणेसाठी नगरपंचायतीने विविध कार्यक्रमांचे नियोजन केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

सायकल रॅलीची सुरूवात नगरपंचायत येथून करून झुलेलाल चौक, पूनमनगर (नालारोड मार्गे), श्रीरामनगर चौक अग्निशामक बिल्डिंग चौक, प्रसादनगर, श्रीकृष्णनगर, साईभूमीनगर (पान मळा), आरबीएल बँक चौक, 500 रूम पाणी टाकी, सौन्दडी बाबा मंदिर, रखमाबाई शेजवळ मार्ग, वराह चौक, सिन्डीकेट बँक, दत्तनगर, गणपती पॅलेस रोड, लक्ष्मीनगर, छत्रपती चौक, नगर-मनमाड रोड व शेवट नगरपंचायत ऑफिस असे एकूण 8 किमीची रॅली पूर्ण केली. या दरम्यान प्रत्येक चौकात थांबून स्वच्छतेबाबत प्रबोधन करण्यात आले. शेवटी नगरपंचायत ऑफिस येथे स्वच्छतेबाबत शपथ घेण्यात येऊन नगरपंचायतचे कर्मचारी अरुण धिवर व सचिन गागरे हे नियमीत सायकलने ऑफिसला येत असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळेस मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी सर्व स्थानिक कर्मचारी यांना दररोज सायकलवर ऑफिसला येण्याचे आवाहन केले.

सदर कार्यक्रमास शिर्डी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे तसेच ग्रिन अॅन्ड क्लीन शिर्डीचे अजित पारख व सर्व पदाधिकारी, शिर्डी ग्रामस्थ व शिर्डी नगरपंचायत कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.