ग्राहकांना येणार्‍या अडचणी शासनाने सोडवण्यासाठी प्रयत्न करावे

ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांची शासनाकडे मागणी
ग्राहकांना येणार्‍या अडचणी शासनाने सोडवण्यासाठी प्रयत्न करावे

राहाता |वार्ताहर| Rahata

औषधांमध्ये होणारी आर्थिक लूट तसेच कृषीविमा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व बँकांकडून होणारा ग्राहकांना त्रास यासह ग्राहकांच्या इतर प्रश्नांची दखल घेऊन याप्रश्नी ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी तहसीलदारांनी विशेष लक्ष घालावे अशी मागणी ग्राहक पंचायतीचे राहाता तालुका अध्यक्ष रावसाहेब गाढवे यांनी ग्राहक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात केली आहे.

राहाता तालुका प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात तहसीलदार कुंदन हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व ग्राहक पंचायतीचे सर्व सदस्य व ग्राहकांच्या उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्तविक महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायत राहाता शाखेचे उपाध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य अ. नि. चौधरी यांनी केले यावेळी प्रास्ताविकात चौधरी म्हणाले की, राष्ट्रीय ग्राहक संरक्षण कायदा 24 डिसेंबर 1986 रोजी संसदेने मंजूर केला आहे तेव्हापासून 24 डिसेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. केंद्र व राज्य स्तरावर ग्राहकांच्या हक्कांची सोडवणूक करून त्यांना संरक्षण प्राप्त करून देण्यासाठी ग्राहक मंत्री मंत्रालय आहे.

राहाता शाखेचे ग्राहक पंचायतचे अध्यक्ष रावसाहेब गाढवे पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की ग्राहकांवर होणारे अन्याय व त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ग्राहक पंचायतीची महत्त्वपूर्ण भूमिका असते शासन स्तरावर विविध समस्या व प्रश्न मांडून ग्राहकांना योग्य न्याय मिळवून देण्याची भूमिका राहता ग्राहक पंचायतीने नेहमीच जपली आहे.

याप्रसंगी सर्वांना मार्गदर्शन करताना तहसीलदार कुंदन हे म्हणाले की शासन स्तरावर एक प्रशासक म्हणून ग्राहकांच्या हक्कांची न्याय मागण्याची योग्य दखल माझे कडून नेहमीच घेतले जाईल. प्राप्त झालेल्या तक्रारी संदर्भात संबंधित विभाग व विभाग प्रमुखांना सूचना देऊन त्याचा पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

या ग्राहक पंचायतीच्या सभेस देवराम पवार, शिर्डी येथील दिलीपभाऊ गोंदकर, खंडू वाघे त्याचप्रमाणे ग्राहक पंचायतीचे राहता तालुक्याचे संघटक अनंतराव गांधी, सहसंघटक प्रकाश बेंद्रे, अध्यक्ष रावसाहेब गाढवे, उपाध्यक्ष अ. नि. चौधरी, सचिव वरूण वर्मा, कोषाध्यक्ष भास्कर बोराडे, प्रवासी संघटक भालचंद्र लोंढे, पत्रकार संघाचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे, सदस्य बाळकृष्ण खंदारे, अविनाश साळुंखे, अनिल चव्हाण, बंशीदास कुंभकर्ण, अनिता जाधव, शरद कुदळे, बंधन मंटला, विलास औताडे, विकास हेमके आदी सदस्य यांच्यासह शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नायब तहसीलदार भाऊसाहेब भांगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त देवराम पवार बंधन मंटाला यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com