संचार बंदीत सात दिवसांत पाच हजार ई-पास
File Photo

संचार बंदीत सात दिवसांत पाच हजार ई-पास

पोलीस प्रशासन : 15 हजार अर्ज दाखल 9 हजार अर्ज बाद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर पडणार्‍या, परराज्यात व दुसर्‍या जिल्ह्यात जाणार्‍या नागरिकांसाठी ई-पास सक्तीचा असल्याचे जिल्हा पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ई-पाससाठी अर्ज केल्यानंतर पोलिसांकडून तो उपलब्ध करून दिला जात आहे.

23 एप्रिलपासून पोलिसांनी ही सेवा सुरू केली आहे. आत्तापर्यंत सुमारे पाच हजार जणांना जिल्हा पोलिसांनी ई- पास दिले आहेत. अत्यावश्यक सेवेचे कारण योग्य नसणे व तांत्रिक कारणांमुळे 9 हजार अर्ज बाद झाले आहे. तर सुमारे एक हजार अर्ज प्रलंबित आहे. ई-पाससाठी सात दिवसांमध्ये 15 हजार जणांनी अर्ज दाखल केले होते.

महत्वाच्या कारणासाठी बाहेरगावी जाणार्‍या नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, यादृष्टीने पोलिसांकडून पास देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. वैद्यकीय कारणासाठी बाहेरगावी रूग्णालयात जाणे, जवळच्या नातेवाईकांचे अंत्यसंस्कार, जवळचे नातेवाईक आजारी असणे, करोना रूग्णांना जेवणाचा डबा घेऊन जाणे, लग्नासाठी जाणे, कामानिमित्त जिल्ह्याबाहरे जाणे या कारणांसाठी लोक अर्ज करत आहे. अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 यावेळेत सुरू ठेवण्यात आल्या आहे.

काही लोक किराणा माल किंवा इतर अत्यावश्यक सेवेचा माल आणायला जायचे म्हणूनही अर्ज करतात, अशांना पोलिसांकडून पास दिला जात नाही. अत्यावश्यक सेवेसाठी सकाळच्या वेळेत परवानगी दिली गेली आहे. पोलिसांकडून अत्यावश्यक सेवेसाठी कारण योग्य असल्यास तत्काळ अर्ज मंजूर करून पास देण्यात येतो. जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात व राज्यात जाण्याचे प्रमाण फार कमी असल्याचे पोलिसांनी सांगितले. करोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता सरकारने संचारबंदी लागू केली.

अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणत गर्दी होत आहे. काही लोक विनाकारण बाहेर फिरत आहे. म्हणून पोलिसांनी पूर्वी सारखी ई- पास सुविधा सुरू केली. आता 15 मेपर्यंत संचारबंदीचा कालावधी वाढल्याने ई-पाससाठी अर्ज करणार्‍यांचे प्रमाण या दोन दिवसांमध्ये वाढले आहे.

ई-पाससाठी सायबर पोलीस करतात काम

विनाकारण बाहेर पडणार्‍यांना लगाम घालण्यासाठी प्रशासनाने ई-पास सेवा सुरू केली आहे. नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांना तत्काळ पास उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा पोलीस दलातील सायबर सेल काम करत आहे. मुख्यालयातील दोन व नगर सायबर पोलिसांचे तीन कर्मचारी सायबर पोलीस ठाण्यातून हे अर्ज मंजूर करत आहे. यासाठी त्यांना पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणार्‍या व्यक्तींना ई-पास उपलब्ध करून दिला जात आहे. ई-पाससाठी अर्ज करताना माहिती व्यवस्थित भरली जात नाही. यामुळे तो अर्ज बाद केला जातो. वैद्यकीय सेवेसाठी बाहेर पडणार्‍या लोकांनी अर्ज करताना व्यवस्थित माहिती भरल्यास, योग्य ते कागदपत्रे जोडल्यास तत्काळ पास दिला जाईल.

- प्रतीक कोळी, (पोलीस उपनिरीक्षक, सायबर सेल)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com