संचारबंदीमुळे जिल्ह्यात अवघ्या 35 बसेसच रस्त्यावर

अत्यावश्यक सेवेसाठी होतोय उपयोग
संचारबंदीमुळे जिल्ह्यात अवघ्या 35 बसेसच रस्त्यावर

अहमदनगर|Ahmedagar

‘ब्रेक द चेन’ नुसार लागू करण्यात आलेल्या संचारबंदीकाळातही राज्य परिवहन मंडळाची बस सेवा सुरू आहे. अत्यावश्यक सेवेसाठी याचा उपयोग होत आहे. मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच परिवहन महामंडळातर्फे गरजेनुसार बस सोडल्या जात असून, सध्या फक्त 30 ते 35 गाड्या रस्त्यावर आहेत. तालुका ते जिल्हा असे हे नियोजन करण्यात आले असल्याचे अहमदनगर एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

सर्वत्र करोनाची दुसरी लाट सुरू आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात करोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. मागील 10 ते 15 दिवसांपासून दररोज तीन हजाराच्या पुढे करोना रूग्ण आढळून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. 14 एप्रिलपासून कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा फटका सर्वच क्षेत्राला बसलेला असताना एसटी महामंडळालाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. प्रादुर्भाव, संचारबंदीचे कडक नियम यामुळे एसटीला प्रवाशी मिळत नाहीत. पर्यायाने महामंडळाने गाड्यांची संख्या कमी केली आहे. यामुळे उत्पन्नावरही परिणाम झाला आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेत एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसला. हळूहळू सर्व खुले झाल्यानंतर महामंडळाने जिल्ह्यात टप्प्याटप्याने गाड्यांची संख्या वाढवली होती. मार्चपर्यंत जिल्ह्यात 300 गाड्या सुरू होत्या. त्यातून दररोज 30 ते 35 लाखांचे उत्पन्न मिळत होते. परंतू, दुसर्‍या लाटेत संचारबंदी लागू झाल्यापासून 30 ते 35 बस सुरू ठेवण्यात आल्या आहेत. या बस केवळ सोमवार ते शुक्रवार सुरू असतात. शनिवार, रविवार बंद ठेवल्या जातात. आवश्यकता असल्यावरच बस सोडल्या जातात. यामुळे 100 टक्के उत्पन्न बुडाले आहे. त्यात डिझेलचे भाव वाढल्यामुळे त्याचाही फटका महामंडळाला बसत आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी जिल्ह्यात बस सेवा सुरू आहे. गरजेनुसार तालुका स्तरावरून जिल्ह्याकडे गाड्या पाठविल्या जातात. सर्व उत्पन्न बुडाले, आता सुरू असलेल्या गाड्यातून काहीच उत्पन्न मिळत नाही. दररोज 30 ते 35 बसेस 10 हजार किलोमीटर धावतात. 5 ते 6 रूपये किलोमीटर प्रमाणे पैसे मिळत असल्याने एसटी महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे.

- विजय गिते विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नगर

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com