सीएसआर फंडातून झेडपीच्या शाळा शंभर टक्के डिजीटल करा

मंत्री विखे : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी निधी उपलब्ध करावा
सीएसआर फंडातून झेडपीच्या शाळा शंभर टक्के डिजीटल करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्राथमिक शिक्षकांनी बदल स्वीकारलेले आहेत. आता त्यांचा आत्मविश्वास वाढण्याची गरज असून जिल्हा परिषदेच्या शाळांना भौतिक सुविधांसोबत जिल्ह्यातील शंभर टक्के शाळा या डिजीटल होणे आवश्यक आहे. यासाठी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून निधी उभा राहू शकतो. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी झेडपीच्या शाळा शंभर टक्के डिजीटल करण्यासाठी आराखडा तयार करावा, अशी सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्यावतीने देण्यात येणार्‍या जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात मंत्री विखे बोलत होते. यावेळी खा.डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीएसआर फंडातून झेडपीच्या शाळा शंभर टक्के डिजीटल करा. आशिष येरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, शरद नवले, राजेंद्र गुंड, अरूण होळकर आदी उपस्थित होते. कोविडमुळे दोन वर्षे आणि यंदाच्या अशा तीन वर्षाच्या एकत्रित पुरस्कारांचे मंत्री विखे यांच्या हस्ते वितरण झाले.

यावेळी खा. डॉ. विखे म्हणाले, तीन वर्षाचे पुरस्कार आमच्याकडे सत्ता आल्यानंतर वितरित करण्याचा मुर्हूत निघाल्याचा आनंद आहे. शिक्षकांसमोर बोलतांना एकही चुकीचे विधान निघाले तर ती राजकीय आत्महत्या ठरले. यामुळे त्यांच्यासमोर बोलण्याचे धाडस होत नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी या शाळांना सुविधा देणे आवश्यक आहे. ज्यादिवशी खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींची मुले झेडपीच्या शाळेत दाखल होतील, तेव्हाच या शाळांचे भाग्य उजळेल. लोक कोट्यावधी रुपये मंदिरासाठी दान देत आहेत, त्याऐवजी हा निधी शाळांना सुविधा देण्यासाठी देणे आवश्यक आहे. जिल्हा नियोजन समितीमधून शाळा खोल्यांपेक्षा संगणक खरेदीसाठी तरतूद व्हावी. शिक्षकांच्या बदल्या सोडून अन्य सर्व विषयात प्राथमिक शिक्षकांसोबत असल्याचे खा. विखे यांनी स्पष्ट केले.

मंत्री विखे म्हणाले, कोविड काळात मोफत लस आणि धान्य देवून पंतप्रधान मोदी यांनी माणसांना जगवले. त्याच्या कामाचे जगभरात कौतूक होत आहे. मोदी यांच्यामुळे 40 वर्षानंतर देशाला नवीन शैक्षणिक धोरण उपलब्ध झाले आहे. नगर जिल्ह्यातील शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत आहे. कोविड काळात शिक्षकांनी आव्हान स्वीकारून काम केले. तुटपुंज्या साधनांचा वापर करून सरकारी शाळांमधील शिक्षक ज्ञानदानाचे काम करत आहेत. मंदीरे उभे करून ज्ञान संपदा उभी करता येत नाही. भविष्यात झेडपीच्या शाळांच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली काढाव्यात. यासाठी काही निधीची तरतूद करावी. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा शंभर टक्के डिजीटल व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रस्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले, पुरस्कार प्राप्त शिक्षक विजय राऊत, तरन्नूम खान यांची मनोगत झाली. सुत्रसंचालन विस्तार अधिकारी के. आर. ढवळे आणि जयश्री कार्ले यांनी केले.

2021 चे पुरस्कारार्थी

हरीबा चौधरी अकोले, ऋषाली कडलग संगमनेर, किरण निंबाळकर कोपरगाव, कल्पना बाविसकर श्रीरामपूर, विठ्ठल काकडे राहुरी, रविंद्र पागिरे नेवासा, भरत कांडेकर शेवगाव, तुकाराम आडसूळ पाथर्डी, पांडूरंग मोहळकर जामखेड, उज्वला गायकवाड कर्जत, राजेंद्र पोटेे श्रीगोंदा, रामदास नरसाळे पारनेर, ज्योती भोर नगर. युसूब शेख (केंद्रप्रमुख).

2020 चे पुरस्कारार्थी

स्मिता धनवटे अकोले, सुशिला धुमाळ संगमनेर, नवनाथ सुर्यवंशी कोपरगाव, वैशाली सोनवणे राहाता, शोभा शेंडगे श्रीरामपूर, दत्तात्रय नरवडे राहुरी, रेवनाथ पवार नेवासा, जयराम देवढे शेवगाव, आरिफ बेग पाथर्डी, मुकूंदराज सातपुते जामखेड, विजय राऊत कर्जत, शोभा कोकाटे श्रीगोंदा, मिनल शेळक पारनेर, जयश्री घोलप नगर, प्रमिला बोर्डे शेवगाव आणि उत्तम शेलार श्रीरामपूर (केंद्रप्रमुख) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

2022 चे पुरस्कारार्थी

संतोष सदगीर अकोला, अशोक शेटे संगमनेर, सुदाम साळुंके कोपरगाव, भिमराज शेळके राहाता, तरन्नूम खान श्रीरामपूर, विद्या उदावंत राहुरी, सुमन तिजोरे नेवासा, सविता बुधवंत शेवगाव, अण्णासाहेब साळुंके पाथर्डी, अनिता पवार जामखेड, नवनाथ दिवटे कर्जत, भावना मोहिते श्रीगोंदा, ज्योती साबळे पारनेर, शरद धलप नगर, बाळासाहेब दळवी पारनेर (केंद्रप्रमुख), भाऊसाहेब गायकवाड राहुरी (केंद्रप्रमुख).

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com