क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारात नोकरदाराची फसवणूक

जादा नफा मिळवून देण्याचे आमिष || पोलिसांत गुन्हा
क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारात नोकरदाराची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारात सावेडी उपनगरातील निर्मलनगरमध्ये राहणार्‍या एका खासगी नोकरदाराची पाच लाखांची फसवणूक झाली आहे. त्या नोकरदाराने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीला 21 फेब्रुवारी 2023 रोजी ‘बीटीसी रोड अ‍ॅण्ड वेल्थ’ या व्हॉटसअल ग्रुपमध्ये घेण्यात आले. ग्रुप अ‍ॅडमिन मिचाले यांनी त्यांना या ग्रुपमध्ये घेतले होते. क्रिप्टो करन्सी व्यापारात काम करणार्‍यांचा हा ग्रुप होता. या ग्रुपवर व्यापाराची आणि एकमेकांना झालेल्या नफ्याची माहिती दिली जात होती. ग्रुप अ‍ॅडमिन यांनी यांच्याशी संपर्क साधल्यावर क्रिप्टो करन्सीमध्ये पैशांची गुतवणूक केल्यास जादा नफा मिळत असल्याचे सांगितले. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीसाठी प्ले स्टोअरमधून ‘बिनांस’ आणि ‘यूसीसी’ वॉल्ट हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार काही रक्कम गुंतवणूक केल्यानंतर नफा बँक खात्यात जमा झाला. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास बसला.

ग्रुप अ‍ॅडमिन मिचाले यांनी 26 फेब्रुवारी रोजी मार्केटची स्थिती चांगली असल्याने जादा गुंतवणूक करा, जादा नफा मिळेल, असे सांगितले. त्यानुसार 2 लाखांची गुंतवणूक केली. त्यावर 12 लाखांचा नफा झाल्याचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर दाखविण्यात आले. ही रक्कम काढण्यासाठी बिनांस करन्सी वाल्यांनी 3 लाख 47 हजार रुपये कमिशन भरण्यास सांगितले. तसेच 4 हजार 223 रुपये कर भरण्यास सांगितले.

फिर्यादी यांना या व्यवहाराबद्दल संशय आल्याने त्यांनी ग्रुप अ‍ॅडमिन मिचाले यांच्याकडे मुद्दलाची मागणी केली असता, त्यांनी कमिशन आणि कर भरल्याशिवाय काही करता येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर कमिशन आणि कर भरला. तरीही पैसे मिळाले नाहीत. प्ले स्टोअरमध्ये युसीसी वॉल्ट हे अ‍ॅप्लिकेशन शोधले असता, ते अ‍ॅप्लिकेशन काढून टाकण्यात आलेले होते. त्यामुळे फसवणूक झाल्याची खात्री झाली. दिलेल्या फिर्यादीवरून ग्रुप अ‍ॅडमिन मिचाले (नाव, पत्ता माहित नाही) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक जे.सी. मुजावर पुढील तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com