गाळप हंगामात ऊस वाहतूकदार संपावर जाणार
File Photo

गाळप हंगामात ऊस वाहतूकदार संपावर जाणार

वाहतूक दरात वाढ करा; राहुरी ऊस वाहतूकदार संघाचा इशारा

टाकळीमिया |वार्ताहर| Takalibhan

एकीकडे उसाच्या एफआरपी व दराबाबत आंदोलन सुरू असतानाच आता ऊस वाहतूक करणारे चालक व मालकांनीही वाहतूक दरात वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी वाहतूक बंदचाही निर्णय घेण्यात येईल, असा सूचक इशाराही चालक-मालकांनी दिला आहे.

टाकळीमिया येथे माजी खा. राजू शेट्टी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, इंधन दरवाढीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करण्याबरोबरच एवढी अवजड वाहने आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने हा व्यवसायच बंद करण्याची वेळ आली आहे. इंधन दरवाढ आकाशाला जाऊन भिडली असतानाच व पेट्रोलच्याच भावात डिझेल मिळत असताना जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदारांनी अर्जविनंत्या करूनही ऊस वाहतूक दरात वाढ करण्याची नकारघंटा वाजविली आहे. याबाबत साखर आयुक्तांनाही मागणी करण्यात आली. मात्र, हा विषय आपल्या अखत्यारीत नसून तो संबंधित कारखान्यांच्या अधिकारकक्षेत असल्याचे सांगून याबाबत आमच्याकडे कायदा नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. त्यामुळे आता याप्रश्नावर दाद कुणाकडे मागायची? असा सवाल वाहतूकदारांना पडला आहे.

इंधनदरवाढीबरोबरच वाहनांचे सुटे स्पेअरपार्ट, टायर व अन्य देखभाल दुरूस्तीच्या खर्चातही मोठी दरवाढ झाली आहे. चालकांचेही वेतन देणे अवघड झाले आहे. मात्र, वाहतूक दरात अद्यापही वाढ होत नाही. त्यामुळे अनेक ऊस वाहतूकदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यातील अनेक वाहने कर्जाऊ रकमेतून घेण्यात आली आहेत. मात्र, हा व्यवसाय करणे जिकिरीचे झाल्याने कर्जाचे हप्ते फेडायचे कसे? ही समस्या उभी राहिली आहे.

साखर कारखानदारांनी तातडीने ऊस वाहतूकदरात वाढ करावी, अन्यथा नाईलाजाने आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागणार असल्याचा इशारा राहुरी तालुका ऊस वाहतूकदार संघटनेचे विष्णू मुळे, विनोद करपे, पंकज घोरपडे, अनिल कोळसे, राहुल हिरे, ज्ञानेश्वर करपे, बाबासाहेब चोथे, अमोल करपे, विजय मोरे, दीपक झुगे, राजू करपे, रियाज सय्यद, नाना चंद्रे, बापू गोसावी, ज्ञानेश्वर मोरे, शुभम माने, दत्ता काळे, भाऊसाहेब वराळे, मनोज अटक, खंडू काळे, पप्पू काळे, सागर झुगे, सचिन हारदे, हमीद सय्यद, रवी म्हसे, संदीप कटारे, योगेश गाडे आदींसह चालक-मालकांनी दिला आहे.

नगर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे. उसाच्या फडात तर पावसामुळे रस्तेच चिखलाने माखले आहेत. त्यामुळे तेथे जाण्यासाठी कसरत करावी लागते. त्यातच नगर-मनमाड महामार्गाची तर वाट लागली आहे. महामार्गावर मोठे खड्डे पडल्याने अनेक वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. तर चालकांनाही जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. जिल्ह्यातील सर्वच रस्ते अतिशय दयनीय झाले आहेत. त्यामुळे इंधन मोठ्या प्रमाणात खर्च होत असून वाहनांचे अनेक स्पेअर पार्ट निकामी होत आहेत. त्यामुळे ऊस वाहतूक करणे अत्यंत जोखमीचे व धोकेदायक आणि खर्चिक झाले आहे.

उसाच्या भाववाढीसाठी शेतकरी एकत्र येत नाहीत. ते संघटित नसल्याचे त्याचा फायदा साखर कारखानदार उचलत आहेत. तशाच प्रकारे ऊस वाहतूकदारही दरवाढीवर संघटित होत नसल्याने वाहतूकदारांना दरवाढ मिळत नसल्याची खंत चालक-मालकांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.