पावसामुळे यंदाचा गळीत हंगाम लांबणीवर जाण्याचा अंदाज

साखर कारखाना
साखर कारखाना

नेवासा | Newasa| तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्रात परतीचा पाऊस ऑक्टोबरच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत बरसत राहील, असा हवामान खात्याचा अंदाज असल्याने आणि ऊस पिकात अद्यापही झालेल्या पावसाचे पाणी साचून असल्याने 15 ऑक्टोबरपासून सुरू होणारा ऊस गळीत हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर गाळपासाठी साखर कारखाने सज्ज झाले आहेत. तसेच काही साखर कारखान्यांची छोटी मोठी कामं सुरू आहेत. राज्यात यावर्षी 14.87 लाख हेक्टर उसाचं क्षेत्र आहे. यावर्षीही ऊस लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

त्यामुळं यंदा साखरेचे उत्पादन देखील वाढणार आहे. यंदा 1 हजार 443 लाख टन उसाचं गाळप होणार आहे. यावर्षी ऊस उत्पादकता ही 95 टन हेक्टरी आहे. तर यंदा 150 लाख टन साखरेचं उत्पादन होणार आहे. मात्र, यातील 12 लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यात येणार आहे. त्यामुळं 12 लाख टन साखर कमी उत्पादीत होणार आहे. यंदा साखरेचं उत्पादन हे 138 लाख टन होणार असल्याचा अंदाज आहे.

200 पेक्षा अधिक साखर कारखाने सुरू होणार...

यावर्षीच्या गळीत हंगामात 200 हून अधिक सहकारी आणि खासगी साखर कारखाने सुरू होणार आहेत. यंदा काही बंद असलेले कारखाने सुरू होत असल्यामुळं ऊस लवकर गाळपासाठी मदत होणार असल्याचे गायकवाड म्हणाले. यावर्षी सरासरी साखर उतारा हा 11.20 टक्के असणार आहे. यावर्षीचा उसाचा गाळप हंगाम हा 160 दिवसांचा असणार आहे. मागील वर्षीचा गळीत हंगाम हा 173 दिवस चालला होता.

60 साखर कारखान्यांकडे 300 कोटींची थकबाकी

गेल्या हंगामात ऊस गाळप केलेल्या 60 साखर कारखान्यांकडे एफआरपी थकीत आहे. जवळपास 300 कोटी रुपयांची शेतकर्‍यांची एफआरपी कारखान्यांकडे थकीत आहे. जोपर्यंत शेतकर्‍यांची थकबाकी दिली जात नाही तोपर्यंत कारखाना सुरू करण्यासाठी परवाना देणार नसल्याचे साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात येते. पण 15 ऑक्टोबरच्या आत राहिलेले साखर कारखाने थकीत एफआरपी देतील असाही अंदाज आहे. जर एफआरपी दिली नाही तर त्यांना साखर कारखाना सुरू करता येणार नाही, तरीही कारखाना सुरू केला तर प्रति दिन त्या कारखान्याला दंड आकारला जाणार आहे.

इथेनॉलचे 119 कोटी लिटर उत्पादन होणार..

यंदा इथेनॉलच्या उत्पादनात देखील मोठी वाढ होणार आहे. यंदा राज्यात 119 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती होईल. तर पुढच्या वर्षी म्हणजे 2023-24 मध्ये 140 कोटी लिटरहून अधिक इथेनॉल निर्मिती होईल. साखर कारखान्यांचा येणार्‍या काळात इथेनॉल निर्मितीवर भर देण्याचाही प्रयत्न असेल.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हंगाम चालणार

यंदाचा ऊस गळीत हंगाम हा मार्चच्या शेवटपर्यंत किंवा फार फार तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालेल अशी आशा आहे. मागील वर्षी इतका उसाचा गळीत हंगाम यंदा लाबणीवर पडणार नाही. यंदा कारखान्यांची संख्याही वाढली आहे. तसेच दुसरे कारण म्हणजे यंदा खोडवा उसाचे क्षेत्र जास्त आहे, त्यामुळे उसाचे टनेज कमी होणार आहे.

ऊसतोड मजुरांसमोर लम्पीचे संकट

राज्यात सुरु होणार्‍या साखर गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध कारखान्यांकडे ऊसतोड मजुरांकडील बैल-गाय व इतर गोवंशीय पशुधनास लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाचे संकट साखर उद्योगासमोर आहे. लम्पीचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी लसीकरण करण्यात आलेल्या पशुधनाचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. साखर कारखान्यात अम्ब्युलन्स, औषध साठा उपलब्ध असणेही आवश्यक आहे. तसेच चेक पोष्ट तयार करून तपासणी करण्यात यावी. स्थानिक पातळीवर महसूल, ग्रामविकास आणि पशुसंवर्धन विभागांनी समन्वय ठेवून काम करावे लागणार आहे. साखर कारखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी असणे आवश्यक राहील. त्यांनी संबंधित जनावरांच्या लसीकरणाची खात्री करावी. बाधित जनावर आढळल्यास विलगीकरण करून त्यावर औषधोपचार करावा. सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com