कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पुणतांबा (वार्ताहर)

येथील गोदावरी नदीच्या असलेल्या प्राचीन काठावर असलेल्या काळातील कार्तिक स्वामी मंदिरात कार्तिक महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तसेच कृतिका मुहूर्ताच्या पर्वकाळात कार्तिक स्वामींच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी काल सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती.

काल अंदाजे १५ हजार भाविकांनी करोना नियमांचे पालन करून दर्शन घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कृतिका नक्षत्राच्या पर्वकाळात वर्षातून एकदाच महिलांना दर्शनासाठी परवानगी असते. चालू वर्षी कृतिका नक्षत्राचा पर्वकाळ गुरुवार १८ नोव्हेंबरच्या उत्तर रात्री १ वाजून २९ मिनिटांपासून शुक्रवार दि. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २.२८ पर्यंत होता. कार्तिक स्वामी देवस्थानच्या

प्रशासनाने गुरुवार दि. १८ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेचा प्रारंभ १२ वाजता सुरू झाल्यानंतर येथील मुक्ताई ज्ञानपीठाचे महंत रामानंदगिरी महाराज, आचार्य भगवान महाराज या मंहतांच्या हस्ते कार्तिक स्वार्मीच्या मूर्तीला अभिषेक व विधिवत पूजा करून ज्या भक्तांना दर्शनासाठी इच्छा होती त्यांना प्रवेश दिला. मात्र मुहूर्त रात्री १.२९ पासून सुरू होत असल्यामुळे अनेकांनी पर्वकाळातच दर्शन घेतले.

रात्री दीड वाजता निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी दर्शन घेतले. शुक्रवार सकाळी ५ वाजेपासून भाविकांची वर्दळ सुरू झाली. प्रशासनाने दर्शन बारीची व्यवस्था केली होती. सकाळी ७ वाजेच्या दरम्यान माजी आ. स्नेहलता कोल्हे तसेच कलावती नितिनराव कोल्हे तसेच दुपारी १२ वाजता जि. प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी दर्शन घेतले.

मंदिर प्रशासनाने सौ. कोल्हे तसेच सौ. विखे यांचा सत्कार केला. महिला भाविकांनी दर्शन घेतल्यावर मंदिराच्या प्रांगणात पणत्यांमध्ये वाती लावून दिपोत्सव साजरा केला. शुक्रवार दुपारी २ वाजून २८ मिनिटांनी पर्वकाळ संपल्यांनतर भाविकांची गर्दी एकदम कमी झाली. मंदिरासमोर विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती. तसेच कार्तिक स्वामींना मोरपिस आवडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मोरपिसांची विक्री केली जात होती.

मंदिराच्या प्रांगणासमोर दक्षिण बाजूला गावाच्या तटबंदीजवळ असलेल्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत असल्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागला. तसेच पार्किंगची विशेष सोय नसल्यामुळे रस्त्यावर तसेच मंदिर परिसरात अनेक वाहने बेशिस्तपणे लावलेली होती. भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे म्हणून कार्तिक स्वामी मंदिर प्रशासन, भक्त मंडळ, सरपंच डॉ. धनजंय धनवटे यांचे सर्व सहकारी, बंदोबस्तासाठी असलेली पोलीस यंत्रणा, स्वंयसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्तिक स्वामीच्या दर्शनासाठी आलेल्या बहुतांशी भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर योगीराज चांगदेव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी चांगदेव महाराज मंदिर परिसरात गर्दी केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com