पंचनामे होऊन महिना उलटला तरीही खरीप पीक विम्यांचे परतावे नाहीत

पंचनामे होऊन महिना उलटला तरीही खरीप पीक विम्यांचे परतावे नाहीत

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpri Nirmal

परतीच्या पावसाने गेल्या महिन्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पीक विमा भरलेल्या शेतकर्‍यांनी तरतुदीनुसार पीक विमा कंपनीकडे तक्रार करून नुकसान भरपाईसाठी क्लेम केले होते. या शेतकर्‍यांचे विमा कंपनीच्या प्रतिनिधीने नुकसानीचे पंचनामे करून महिना उलटला तरी अद्याप विम्याने परतावे मिळाले नसल्याने शेतकर्‍यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

ऑक्टोबर महिन्यात राहाता तालुक्यातील पुणतांबा, राहाता, बाभळेश्वर या तीन मंडळांतील गावांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस झाला होता. या पावसाने सोंगणीस आलेले व सोंगलेल्या सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पीक विमा योजनेत या टप्प्यावर नुकसान झाल्यास नुकसान भरपाईची तरतूद आहे. त्यासाठी कंपनीच्या हेल्पलाईन नंबरवर तक्रार करणे आवश्यक होते. तालुक्यातील जवळपास दीड हजार शेतकर्‍यांनी विमा कंपनीच्या हेल्पलाईन नंबरवर तक्रारी केल्या होत्या. कंपनीकडून या तक्रारदार शेतकर्‍यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीचे प्रतिनिधी मार्फत पंचनामे करण्यात आले होते.

या पंचनाम्यांना महिना उलटला आहे. अद्याप या शेतकर्‍यांना विमा कंपनीकडून विम्याचे परतावे देण्यात आलेले नाहीत. नुकसानीचे पंचनामे होऊनही विमा कंपनीकडून परतावे देण्यात हालगर्जीपणा केला जात आहे. शेतकरी राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून पीक विम्यापोटी भरीव विमा हप्ते घेऊनही परतावे देण्यात विमा कंपन्यांकडून टाळाटाळ होत असल्यामुळे शेतकर्‍यांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. विमा कंपनीने तातडीने पीक विम्यांचे परतावे शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनी विम्याच्या परताव्यासाठी पिक विमा कंपनीकडे तक्रारी दाखल कराव्यात यासाठी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयाकडून माहिती व जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. त्या माहितीमुळे अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेल्या दिड हजारांवर शेतकर्‍यांनी कंपनीकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. कंपनीच्या प्रतिनिधीने या शेतकर्‍यांचे पंचनामे केलेले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com