पिकांचे सरसकट पंचानामे करून नुकसान भरपाई द्या - हर्षदा काकडे

अन्यथा शेतकर्‍यांचा आंदोलनाचा इशारा
पिकांचे सरसकट पंचानामे करून नुकसान भरपाई द्या - हर्षदा काकडे

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यातील शेतकर्‍यांनी चालू हंगामी कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी आदी पिकांची पेरणी व लागवड केली. परंतु ढगाळ हवामान व सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून मोठा संघर्ष करतील असा इशारा जि.प.सदस्या हर्षदा काकडे यांनी दिला.

काकडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकर्‍यांनी तहसीलदार छगनराव वाघ व तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण टकले यांना शेवगाव येथे निवेदन दिले. यावेळी जगन्नाथ गावडे, राजू पातकळ, अशोकराव ढाकणे, सुरेश चौधरी, कॉ.राम पोटफोडे, भाऊसाहेब सातपुते, सचिन आधाट, बाबासाहेब म्हस्के, बाळासाहेब नरके, विष्णू दिवटे, विनायक मोहिते, लक्ष्मण पातकळ, वैभव पूरनाळे, अकबर शेख, भागचंद कुंडकर, रघुनाथ सातपुते, घोंगडे मनोज, शिवाजी कणसे, आबासाहेब काकडे, संजय झिरपे, मनोहर डोंगरे, गवनाथ रोडगे, पांडुरंग चेडे, विजय लेंडाळ, काळे कचरू यावेळी प्रमुख उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, चालूवर्षी सुरू असणार्‍या संततधारेमुळे कापूस, तूर, सोयाबीन, उडीद, मूग, बाजरी आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सदरची पिके ही आज अडीच महिन्यांची झाली असून देखील त्यांची वाढ फारच कमी आहे. शेतकर्‍यांनी पेरणी व मशागतीसाठी उसनवार घेऊन शेतीसाठी खर्च केला होता. एकरी 12 ते 15 क्विंटल होणारा कापूस आता 2 ते 3 क्विंटल होतो की नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पीक उत्पादनामध्ये प्रचंड मोठी घट येणार आहे.

खतांचे वाढलेले भाव व मजुरांची वाढलेली मजुरी पाहता झालेला खर्च देखील निघतो की नाही अशीच परिस्थिती शेतकर्‍यांसमोर आहे. तरी शेवगाव तालुक्यातील पिकांचे सरसकट पंचनामे करून शासनाने जाहीर केल्याप्रमाणे हेक्टरी 13 हजार 600 रुपयां प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून मोठा संघर्ष करतील असेही निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com