नुकसानीचे पंचनामे करण्यात प्रशासनाचा दुजाभाव

File Photo
File Photo

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

अतिवृष्टीमुळे सोनेवाडी परिसरातही मोठे नुकसान झाले. गोदावरी उजव्या कालव्याच्या कडेला असलेली शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली.

त्यामुळे उभी पिके जमीनदोस्त झाली. पंचक्रोशीच्या काही भागात प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम चालू आहे मात्र सोनेवाडीला झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाचा दुजाभाव का? असा सवाल अतिवृष्टीने बाधित झालेले शेतकरी आप्पासाहेब जावळे यांनी केला आहे.

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे पावसामुळे आप्पासाहेब जावळे यांचे तीन एकर क्षेत्र पूर्ण पाण्याखाली आले. त्यांचे राहण्याचे घरही पाण्याने वेढले गेले. कांदा चाळ भिजून त्याचेही नुकसान झाले. दोन एकर सोयाबीनमध्ये जवळपास सोयाबीन बुडेल इतके पाणी होते त्यामुळेही सोयाबीन काढण्याची परिस्थिती राहिली नाही.

तर एक एकर उभा असलेला ऊस देखील उपळून गेला आहे.त्यांच्या बाजूला असलेल्या रंभाजी भागवत गुडघे, रामदास गजाराम जावळे, भिकाजी भागवत जावळे, त्र्यंबक बाबुराव दहे, सोमनाथ त्रिंबक दहे, अण्णासाहेब पंढरीनाथ दहे, विठ्ठल बाबुराव दहे आदी शेतकर्‍यांची सोयाबीन, मका, ऊस पिके पूर्ण पाण्याखाली गेली असून ती उद्ध्वस्त झाली आहेत.

मुरघास व गाईच्या गोठ्यालाही पाणी लागल्यामुळे जनावरांच्या निवार्‍याचाही प्रश्न निर्माण झाला. अप्पासाहेब जावळे यांनी ग्रामपंचायत सोनेवाडीला ही माहिती कळविल्यानंतर सरपंच गंगाराम खोमणे, उपसरपंच किशोर जावळे, जनार्दन खरात, कांतिलाल लांडबले यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

गेल्या आठ दिवसांपासून हे कुटुंब राहत असलेल्या वस्तीवर विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे मोठ्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. आतातरी प्रशासनाने या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन या शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत व विद्युत पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी या शेतकर्‍यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com