पीक कर्जाला 0 टक्के व्याज घोषणाच

राज्याकडून लाखाला तीन टक्के तर 3 लाखाला एक टक्का परतावा
पीक कर्जाला 0 टक्के व्याज घोषणाच

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून अर्थ संकल्पात 3 लाखांपर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी देण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणाच फसवी निघाली असून एक लाखापर्यंत पीक कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांना राज्य सरकारकडून 3 टक्के तर एक लाख ते 3 लाखापर्यंत पीक कर्जाला अवघा एक टक्का परतावा मिळणार आहे. जिल्हा बँकेने सेवा सोसायट्यांना याबाबत माहिती संकलनाच्या लेखी सूचना दिल्या आहेत.

जिल्हा बँक व सहकारी सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून 3 लाखापर्यंत पिक कर्ज घेणार्‍या व मुदतीत परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना राज्य सरकारने अर्थसंकल्पात शुन्य टक्के व्याजदराची घोषणा केली होती. 2020-21 मध्ये जिल्हा बँकेने सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून अल्पमुदत पीक कर्जाची वाटप केलेल्या व मुदतीत कर्जाची सहा टक्के व्याजासह परतफेड केलेल्या शेतकर्‍यांना व्याज परतावे देण्यासाठी विहीत नमुन्यात माहिती मागविली आहे. यानुसार राज्य सरकारच्या पंजाबराव देशमुख अल्पमुदत पीक कर्ज सवलत योजने अंतर्गत एक लाखापर्यत पीक कर्ज घेणार्‍या व मुदतीत सहा टक्के व्याजासह परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना तीन टक्के व्याजाचा तर एक लाख ते तीन लाखांपर्यंत पीक कर्ज घेणार्‍या व मुदतीत सहा टक्के व्याजदराने परतावा करणार्‍या शेतकर्‍यांना एक टक्के व्याजदराने परतावा मिळणार आहे.

जिल्हा बँकेने महाराष्ट्र शासन निर्णय 18 जून 2007 सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 79(अ) धोरणा प्रमाणे व्याज परतावा आकारणीच्या सूचना सेवा सोसायट्यांना परीपत्रक काढून दिल्या आहेत. यामध्ये मार्च 2021 मधील अर्थसंकल्पात राज्य शासनाने तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने देणार या घोषणेचा उल्लेखच नसल्याने सरकारची ही घोषणा केवळ सवंग प्रसिध्दीसाठीच होती का ? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.केद्रं सरकार तीन लाखापर्यतच्या पिक कर्जाला तीन टक्के व्याज परतावा देते त्यामुळे शेतकर्‍यांना राज्य व केंद्र मिळून एक लाखांपर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी मिळणार आहे.

मात्र एक लाख ते तीन लाखांपर्यंत पीक कर्जावर शेतकर्‍यांना दोन टक्के भुर्दंड पडणार आहे.करोना संकटा मुळे चालू वर्षी सरकारने नियमित पीक कर्ज भरण्यास 31 जुलै 2021 पर्यत मुदतवाढ दिली होती.या मुदतीत व्याजासह कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना केद्रं व राज्याची व्याज परताव्याची रक्कम प्रथमच शेतकर्‍यांच्या केसीसी बँक खात्यात डीबीटी मार्फत होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com