मुदत संपण्यापूर्वीच पीकविमा भरण्याचे संकेतस्थळ बंद
doidam10
सार्वमत

मुदत संपण्यापूर्वीच पीकविमा भरण्याचे संकेतस्थळ बंद

शेतकर्‍यांची निराशा; पीकविम्याची मुदत वाढविण्याची मागणी

Arvind Arkhade

देवळाली प्रवरा|वार्ताहर|Devlali Pravara

खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीकविमा भरण्यासाठी शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दि.31 जुलै 2020 ही अखेरची तारीख असताना दोन दिवस अगोदर म्हणजे 29 जुलै मध्यरात्रीपासूनच राज्य शासनाने हे संकेतस्थळ बंद केल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहिले आहेत. शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पीकविम्याची मुदतवाढ करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

शेतकर्‍यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी व शेतकरी बांधवांना नुकसानग्रस्त पिकाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी गेल्या काही वर्षापासून प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू करण्यात आली आहे.

त्याप्रमाणे यंदा ही योजना खरीप हंगामातील पिकासाठी सुरु करण्यात आली असल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे ही योजना 31 जुलै 2020 पर्यंत सुरु राहणार असून याचा जास्तीजास्त शेतकरीबांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे शेतकरीबांधवांनी खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, मका, तूर, भुईमूग आदी पिकांचा विमा भरणे सुरु केले.

परंतु ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना सेतू कार्यालया समोर जादा गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेवून उभे राहावे लागत होते. विमा अर्ज भरण्यासाठी शेतकरी तासन्तास ताटकळत उभे राहत होते. परंतु संकेतस्थळ अत्यंत धिम्यागतीने चालत असल्याने अनेक शेतकर्‍यांना माघारी जावे लागत होते.

काही ठिकाणी तलाठी कार्यालयाचा कार्यभार दुसर्‍या तलाठी कार्यालयाकडे असल्याने उतारे मिळण्यासाठी विलंब लागत होता. बँक पासबुक व इतर कागदपत्रांची झेरॉक्स काढण्यासाठी वीजपुरवठा खंडीत असल्याने तासन्तास थांबावे लागत होते. या सर्व अग्निदिव्यातून बाहेर पडून सेतू केंद्रावर पीकविमा फॉर्म भरण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यांना हे संकेतस्थळ रात्रीपासूनच शासनाने बंद केले असल्याचे सेतूचालकाने सांगितले.

यामुळे हिरमुसलेले शेतकरी आपल्या घराकडे रवाना झाले. शासनाने दोन दिवस अगोदर हे संकेतस्थळ बंद केल्याने शेतकर्‍यांनी या बाबत तिव्र संताप व्यक्त केला आहे. पीकविमा योजने पासून शेतकरी वंचित राहू नये म्हणून या योजनेला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

कृषी अधिकारी काशिनाथ आडभाई यांना विचारले असता त्यांनी सांगितले, या बाबत आमचे कालपासून प्रयत्न सुरु आहेत. संकेतस्थळ सुरु करण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावरील अधिकार्‍यांना माहिती देण्यात आली आहे. शेतकरी पीकविमा योजने पासून वंचित राहू नये, म्हणून मुदतवाढ मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com