पीक विम्याचे 1 कोटी 91 लाख शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा - आ. काळे
सार्वमत

पीक विम्याचे 1 कोटी 91 लाख शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा - आ. काळे

Arvind Arkhade

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील शेतकर्‍यांना मागील वर्षीचा कपाशी पिकांचा पीक विमा मिळावा याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा शेतकर्‍यांना दिलासा देऊन 2019-20 या वर्षाच्या कपाशी पीक विम्याचे 1 कोटी 86 लाख रुपये व 2018-19 या वर्षाच्या ज्वारी पीक विम्याचे 5 लाख असे एकूण पीक विम्याचे 1 कोटी 91 लाख रुपये शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केले असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका, कोपरगाव, पोहेगाव, सुरेगाव व रवंदे या पाचही महसूल मंडलातील असंख्य शेतकर्‍यांनी मागील वर्षी 2019/20 मध्ये कपाशी पिकांचा विमा भरलेला होता. या शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम तातडीने मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता. त्याबाबत महाविकास आघाडी सरकारने करोना संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना मदतीचा हात देऊन पीक विम्याची रक्कम देण्याचा निर्णय घेतला.

यामध्ये मागील वर्षीच्या कपाशी विम्याचे 1 कोटी 86 लाख व 2018 च्या ज्वारी पीक विम्याची 5 लाख 27 हजार असा एकूण 1 कोटी 91 लाख 27 हजार रुपये पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. सर्व मंडलातील एकूण 2 हजार 350 शेतकर्‍यांना याचा फायदा झाला आहे.

महाविकास आघाडी सरकारने कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकर्‍यांना मागील महिन्यात 70 लाख रुपये ठिबक सिंचन अनुदान दिले असून ही रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात यापूर्वीच जमा झाली आहे.

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देखील शासनाने शेतकर्‍यांना दिली असून पुन्हा एकदा पीक विम्याची रक्कम देऊन शेतकर्‍यांबाबत अतिशय चांगला निर्णय घेऊन शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील शेतकर्‍यांच्यावतीने महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com