पिकांच्या नुकसानीचे, घरांचे पंचनामे तातडीने करा- कानवडे

पिकांच्या नुकसानीचे, घरांचे पंचनामे तातडीने करा- कानवडे

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

महिनाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे सध्या अतिवृष्टी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. पाऊस अद्यापही सुरुच असून शेतकर्‍यांना हाती आलेल्या पिकांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्‍यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने विनाअट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष कानवडे यांनी केली.

संगमनेर तालुक्यातील साकूर, हिवरगावपठार, मांडवे, शिंदोडी, कौठे मलकापूर, बिरेवाडी, जांबुत, पिंपळगाव देवा, खंडेरायवाडी, माळेगाव पठार, सारोळेपठार, वरुडीपठार तसेच अकोले तालुक्यात विरगाव, देवठाण, गणोरे व इतर भागात झालेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे.

कानवडे म्हणाले, खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून कमी अधिक स्वरुपात पाऊस सुरू आहे. त्यामुळे बर्‍यापैकी भाजीपाला, ऊस, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक भागातील पिके पाणी साचून सडली आहेत. पावसाचे पाणी वाहिल्याने पिकांसह घरांचे, जमिनीचे देखील नुकसान झाले आहे. आता बाजरी, सोयाबीन काढण्याचे काम सुरू तर मात्र 8 दिवसांपासून पाऊस उघडीप देत नसल्याने शेतात पाय ठेवणे अशक्य झाले आहे. खर्च होऊनही हाती उत्पन्न येण्याची शक्यता पावसाने दुरावली आहे.

नुकसानीचे वस्तुनिष्ठ अहवाल शासनास सादर करून विनाअट नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला, यावेळी छावा क्रांतिवीर सेना कामगार आघाडी तालुकाध्यक्ष संदीप राऊत, उपतालुकाध्यक्ष सचिन गांजवे, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष नवनाथ राऊत, वि. आघाडी तालुकाध्यक्ष लक्ष्मण सातपुते, शहराध्यक्ष मनोहर जाधव, तालुका संपर्क प्रमुख गणेश फरगडे, कलाकार आघाडी अध्यक्ष भागवत कानवडे, सचिन कानवडे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com