मुख्यमंत्र्यांना दोन लाखांच्यावरचे पिक कर्ज माफीसाठी शेतकर्‍यांची आर्त हाक

मुख्यमंत्र्यांना दोन लाखांच्यावरचे पिक कर्ज माफीसाठी शेतकर्‍यांची आर्त हाक

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शेतकर्‍यांच्या आत्महत्या होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. म्हणूनच ‘मुख्यमंत्री साहेब तुम्ही तरी दोन लाखांच्यावर पिक कर्ज असलेल्या शेतकर्‍यांची रखडलेली कर्जमाफी आता तरी करा’ अशी आर्त हाक तालुक्यातील शेतकरी बांधवांनी दिली आहे.

शिवसेनेचे एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत विराजमान होताच त्यांनी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. शिंदे यांचे कुटुंब शेतकरी असल्याने त्यांना शेतकर्‍यांच्या सुख दुःखाची चांगल्या प्रकारे जाण आहे. त्यामुळे गेली आडीच ते तिन वर्ष रखडलेली दोन लाखा वरील पिककर्जाची कर्जमाफी शिंदे सरकारने लवकर करावी अशी अपेक्षा तमाम शेतकरी बांधवांना आहे.

मागील महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र, त्यांनी दोन लाखाच्या आत कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांची कर्ज माफ केली. मात्र दोन लाखाच्या वर कर्ज असणार्‍या शेतकरी बांधवांना वार्‍यावर सोडले. सरकारच्या या निर्णया बाबत शेतकरीबांधव आक्रमक झाल्या नंतर सरकारने शेतकर्‍यांच्या कर्जखात्यासाठी सरकार दोन लाख देईल व उर्वरीत बाकी शेतकर्‍यांनी भरावी, अशी घोषणा तात्कालीन सरकारने केली होती.

या घोषणेचा तात्कालीन सरकारला विसर पडला. कोरोना नंतर तरी निर्णय होईल असे वाटत होते. या गोष्टीला आता आडीच,तिन वर्ष झाले तरी या बाबत सरकारने काहीच निर्णय न घेतल्याने व सरकार लवकरच कर्जमाफी करील, या आशेवर जगणार्‍या शेतकर्‍यांचे दोन लाखाच्या वर कर्ज असणारे बँक खाते थकबाकीत गेले. या खात्यावर बँकेच्या व्याजाचा डोंगर दिवसेदिवस वाढत चालला आहे. यामुळे ही रक्कम मुद्दल रक्कमेच्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना देखील ही रक्कम भरणे आता अवघड झाले आहे.

आभाळाला भिडलेली महागाई व शेतमालाचे सतत पडणारे बाजारभाव यामुळे शेतकरी बांधव मेटाकुटीला आला आहे. . पिककर्जाचे खाते थकीत गेल्याने बँका दारात उभे राहू देत नाही. त्यामुळे नवीन कर्ज मिळेना. रब्बी गेला, खरीप आला. शेती पडीक पडण्या पेक्षा उधार उसनवारी करुन वेळ प्रसंगी खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन व पत्नीच्या गळ्यातील मणीमंगळसुत्रा सह घरात असणारे किडुकमिडुक मोडून कसे तरी पिक उभी केली पण दुर्दैवाने तिथं देखील पाट सोडली नाही. पिकं निघाली आणि शेतमालाचे भाव पडले. झालेला खर्च देखिल निघणे मुश्कील झाले.

मुला,मुलींचा शैक्षणिक खर्च, त्यांच्या विवाहाचा खर्च, कौटुंबिक खर्च, आरोग्याचा खर्च आदी खर्च कसे भागविणार असा प्रश्न बळीराजा समोर उभा ठाकला आहे. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी व या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलावी व शेतकर्‍यांना लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी तर तो टिकेल. व मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य सार्थ ठरेल ? आणि बळीराजा पुन्हा नव्या दमाने उभा राहील.

काही शेतकरी बांधवांनी पिककर्ज थकबाकी बाबत बँका बरोबर वनटाईम सेटलमेंट करुन तडामोडा करुन पिककर्ज भरले. मात्र कर्जांच्या रक्कमेचा भरणा होताच बँकांनी नवीन कर्ज द्यायला हात वर केले. कारण काय तर म्हणे वन टाईम सेटलमेंट मुळे बँकेचे नुकसान झाले. त्यामुळे बँक तुम्हाला नविन कर्ज देऊ शकत नाही. असा निर्णय बँकांनी घेतल्याने इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था शेतकर्‍यांची झाली आहे. नविन कर्ज न मिळाल्याने पिके कशी उभी करायची हा प्रश्न शेतकरीबांधवांना पडला आहे. आता यातून मार्ग फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्की काढतील, अशी आशा तमाम शेतकरी बांधवांना लागली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com