3 लाख 63 हजार क्षेत्राला पिकविमा कवच

रब्बी हंगाम || 2 लाख 95 हजार शेतकर्‍यांचे 6 लाख 50 विमा अर्ज
3 लाख 63 हजार क्षेत्राला पिकविमा कवच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यंदा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना राज्य सरकारकडून खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातील पिकांनाही एका रुपयात विमा उपलब्ध करून देण्यात आला. रब्बी हंगामात शनिवारअखरे 3 लाख 62 हजार 740 हेक्टर क्षेत्राचा शेतकर्‍यांनी विमा उतरवला आहे. जिल्ह्यातील 2 लाख 94 हजार 924 शेतकर्‍यांनी सरकारच्या विमा योजनेत सहभाग नोंदवला असून यात 6 लाख 44 हजार 440 कर्जदार तर 11 हजार 514 बिगर कर्जदार अशा प्रकारे सुमारे 6 लाख 50 हजार शेतकर्‍यांचे विमा अर्ज असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

यंदा पावसाने ओढ दिली असल्याने खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिकांचे उत्पादन घटले असून, त्या बदल्यात विमा कंपन्यांकडून 25 टक्के आगाऊ भरपाई दिली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा रब्बी हंगामातील पिकांसाठी विम्याचे कवच घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल अधिक असल्याचे दिसून आले. यंदाच्या रब्बी हंगाम पीक विमा योजनेत रब्बी ज्वारीसाठी नोव्हेंबरअखेर, तर बागायत गहू, हरभरा, रब्बी कांद्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत पिक विमा काढण्याची अंतिम मुदत होती. खरीप हंगामात कमी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान झाले. विमा कवच असणार्‍या शेतकर्‍यांना जिल्हाधिकारी यांनी अधिसुचना काढत 25 टक्के विमा भरपाईची आगावू रक्कम देण्याची अधिसुचना काढली आहे.

त्यानूसार आता जिल्ह्यातील सुमारे सव्वा दोन लाख शेतकर्‍यांना 25 टक्के अग्रामची रक्कम भरपाईची म्हणून शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. दुसरीकडे काही विमा प्रकरणाबाबत विमा कंपनीने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाविरोधात विभागीय आयुक्त, राज्य सरकार आणि आता केंंद्राकडे अपिल केलेले आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक 1 लाख 62 हजार 902 आणि मका उत्पादक 67 हजार 862 शेतकर्‍यांना 25 टक्के अग्रमीची रक्कम अदा करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पुन्हा रब्बी हंगामातील पिकांना 2 लाख 94 हजार शेतकर्‍यांनी विमा संरक्षण घेतले असून ज्वारी, गहू, हरभरा, कांदा आणि उन्हाळी भूईमूग या पिकांची 3 लाख 62 हजार 740 हेक्टवरील पिकाचा विमा उतरवलेला आहे. शेतकर्‍यांनी काढलेल्या विम्याची संरक्षित रक्कम ही 2 हजार 58 कोटींची आहे.

विमा काढलेल्या पिकांचे क्षेत्र

पारनेर 41 हजार 155, नेवासा 34 हजार 989, नगर 22 हजार 309, कोपरगाव 29 हजार 227, कर्जत 27 हजार 490, जामखेड 36 हजार 886, अकोले 9 हजार 131, पाथर्डी 23 हजार 627, राहाता 27 हजार 736, राहुरी 19 हजार 301, संगमनेर 32 हजार 704, शेवगाव 23 हजार 430, श्रीगोंदा 17 हजार 481 आणि श्रीरामपूर 17 हजार 274 हेक्टर आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com