पीकविम्याची मुदत वाढली; शेतकर्‍यांना दिलासा

आमदार आशुतोष काळे
आमदार आशुतोष काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

पीक विमा अर्ज सादर करण्याची मुदत 31 जुलैपर्यंतच असल्यामुळे असंख्य शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार होते. त्यामुळे पीक विम्यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी मागील आठवड्यात आ. आशुतोष काळे यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. त्या मागणीची दखल घेऊन पीक विम्यासाठी अर्ज करण्याची मुदत 3 ऑगस्टपर्यंत वाढविली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले असून राज्य शासनाने यावर्षी पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याच्या घेतलेल्या निर्णयानुसार शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासन भरणार असून शेतकर्‍यांना केवळ एक रुपया भरुन पीक विमा पोर्टलवर नोंदणी करून पीक विम्यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे. पिक विमा अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलै पर्यंतच देण्यात आलेली होती.

परंतु पीक विमा अर्ज भरण्यासाठी सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे मतदार संघातील 60 हजारांच्यावर शेतकरी पीक विमा अर्ज भरू शकले नव्हते. जर पीक विमा अर्ज मुदतीत भरला गेला नाही तर हजारो शेतकरी पीक विम्याला मुकणार होते. त्यामुळे पीक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यांना येत असलेल्या अडचणी आ.आशुतोष काळे यांनी मागील आठवड्यात राज्याचे कृषी मंत्री मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे मांडल्या होत्या.

त्या पत्राची दखल घेऊन शेतकर्‍यांना येत असलेल्या अडचणींची जाणीव ठेवून पीक विमा अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून 3 ऑगस्ट केली आहे. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांनी अजूनही पीक विम्याचा अर्ज भरलेला नाही त्या शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला असून पीक विमा अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com