160 कोटी 28 लाखांचा पीक विमा अग्रीम जमा होणार

नगर जिल्ह्यातील 2 लाख 31 हजार शेतकर्‍यांना लाभ
160 कोटी 28 लाखांचा पीक विमा अग्रीम जमा होणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात 35 लाख 8 हजार शेतकर्‍यांना 1 हजार 700 कोटी 73 लाख रुपये पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. बहुतांश ठिकाणी दिवाळी पूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.यात नगर जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 2 लाख 31 हजार शेतकर्‍यांना 160 कोटी 28 लाखांचा अग्रीम पीक विमा वितरित होणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

विमा रक्कम लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे. खरीप हंगामात विविध जिल्ह्यांत हवामानाच्या असमतोलामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीक विमा योजनेमध्ये राज्यातील 1 कोटी 71 लाख शेतकर्‍यांनी सहभाग घेतलेला आहे. अंतरिम नुकसान भरपाई अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीक विमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून 25 टक्के अग्रीम पीक विमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यावरून बहुतांश कंपन्यानी विभागीय व राज्यस्तरावर अपील केलेले होते. अपिलांच्या सुनावण्या होत गेल्या, त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित विमा कंपन्यांनी एकूण 1700 कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे. तसेच जसजसे अपिलांचे निकाल येतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे.

अग्रीमबाबत समस्या तातडीने सोडविण्यासंदर्भात मंत्री श्री.मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संबंधित पीक विमा कंपन्यांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही विम्याबाबत आग्रही होते. तसेच उर्वरित जिल्ह्यातील सर्वेक्षण, अपिलावरील सुनावण्या आदी बाबी तातडीने पूर्ण करण्याबाबत विभागाला सूचना मंत्री श्री.मुंडे यांनी केल्या आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com