विम्यापोटी प्रतिगुंठा शेतकर्‍याला मिळाले अवघे 5 रुपये 37 पैसे

शेतकर्‍यांची थट्टा! विमा कंपनीकडून तालुका प्रशासनाने मागविला अहवाल
विम्यापोटी प्रतिगुंठा शेतकर्‍याला मिळाले अवघे 5 रुपये 37 पैसे

राहाता तालुका | महेंद्र जेजुरकर| Rahata

पीक विमा शेतकर्‍यांनी भरला, ढगफुटीने नुकसान झाले, विमा कंपनीने पाहणी न करताच शेतकर्‍याला अवघी 5 रुपये 37 पैसे गुंठ्याने विम्याची रक्कम शेतकर्‍याच्या खात्यावर पाठवत शेतकर्‍याची एकप्रकारे थट्टाच केली आहे. हा विचित्र अनुभव केलवड येथील शेतकर्‍याला आला.

तालुक्यातील केलवड येथील बाबुराव सावळेराम गमे या 90 वर्षीय शेतकर्‍याची 2 हेक्टर 61 आर म्हणजेच 261 गुंठे शेती गट नंबर 422, 423 आणि 426 मध्ये आहे. त्यांनी सुरुवातीला विमा कंपन्यांच्या आवाहनानुसार या सर्व क्षेत्राचा 2989 रुपये विमा उतरविला. त्यात सोयाबीन तसेच चारा पिकांचा समावेश होता. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने त्यांचे पीक पूर्णतः वाया गेले. विमा कंपनीने त्यांना या 261 गुंठ्याचे अवघे 1406 रुपये पाठविले. गुंठ्याचा विचार करता त्यांना प्रति गुंठा अवघी 5 रुपये 37 पैसे इतका रक्कम मिळाली. ही रक्कम म्हणजे शेतकर्‍यांची थट्टाच आहे.

प्रधान मंत्री पीक विमा योजनेत सोयाबीन सारख्या पिकाला हेक्टरी विमा संरक्षीत रक्कम 57267 रुपये इतकी असते. यासाठी विमा दर रक्कम 14 टक्के असते. म्हणजेच विमा हप्ता 8017.38 रुपये असतो. त्यातील शेतकर्‍याचा 2 टक्के तो 1145.34 रुपये व राज्य सरकारचा 3436.02 व केंद्र सरकारचा 3436.02 रुपये हिस्सा अनुदान रुपात 6 टक्के असतो. म्हणजेच तीनही स्तरावर 2+6+6=14 टक्के प्रमाणे 8017.38 रुपये भरले जातात. म्हणजेच हेक्टरी विमा कंपनीला 8017.38 रुपये हप्ता भरला जातो. इतर पिकांचा विमा हप्त्याचा दर वेगवेगळा असतो. म्हणजेच प्रतिगुंठा 80 रुपये 17 पैसे विमा कंपनीला भरले जातात. मात्र केलवडच्या गमे या शेतकर्‍याचा अनुभव पाहता त्यांना 100 टक्के नुकसान होऊनही प्रतिगुंठा विमा कंपनीने अवघे 5 रुपये 37 पैसे पाठविले आहेत.

विमा उतरविण्याचा आग्रह धरला जातो, नुकसान होते, प्रत्यक्ष पाहणी केली जात नाही. न बघताच किरकोळ रक्कम पाठविली जाते. ही शेतकर्‍यांची थट्टाच आहे. गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी अन्याय सहन करत आला आहे. गेल्या वर्षी आपल्या एका विमा प्रतिनिधीने तुमचे 28 हजार रुपये मंजूर झाले. कागदपत्रे द्या, आपण कागदपत्रे दिली परंतु एक रुपयाही मिळाला नाही. आताही वडिलांच्या नावावरील क्षेत्राचा विमा उतरविला होता. पण 5 रुपये प्रतिगुंठ्याने पैसे मिळाले.

- नामदेव बाबुराव गमे, शेतकरी केलवड

आपले 3.5 एकर क्षेत्राचा आपण विमा उतरविला. ढगफुटीने सोयाबीनचे नुकसान झाले. शेतातील सोयाबीनचे पीक हातचे गेले. पीक विमा मिळेल, अशी आशा होती. परंतु एक रुपयाही मिळाला नाही.

- गणेश घोरपडे, शेतकरी, केलवड

ज्या शेतकर्‍यांच्या विम्याबाबत तक्रारी आहेत. त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तालुक्याचे तहसीलदार यांच्या समवेत शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेतली. बैठकीत विमा कंपन्यांबाबत शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. त्यासंदर्भात विमा कंपनीकडून रक्कम कमी आल्याचा अहवाल कंपनीकडून मागण्यात आला आहे. अहवाल प्राप्त होताच व त्यात तथ्य आढळल्यास उर्वरित रक्कम शेतकर्‍यांच्या खाती जमा करण्यात येईल.

- बापुसाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com