पीक विमा कंपनीकडून भरलेल्या हप्त्याएवढीही भरपाई नाही

पहिल्या टप्प्यात 34 हजार 373 शेतकर्‍यांना परतावा
पीक विमा कंपनीकडून भरलेल्या हप्त्याएवढीही भरपाई नाही
पीक विमा योजना

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

मान्सून काळात अतिवृष्टी होवून नुकसान झालेल्या जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात 34 हजार 373 शेतकर्‍यांना पीक विमा कंपनीकडून विमा परतावे देण्यात आले आहेत. मात्र या परताव्यांच्या रकमा भरलेल्या विमा हप्त्याएवढ्याही नसल्यामुळे विमा कंपनीकडून शेतकर्‍यांची थट्टा केल्याची प्रतिक्रिया शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे.

मान्सून काळात अतिवृष्टीने जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. भारती अ‍ॅक्सा या पीक विमा कंपनीकडे शेतकर्‍यांनी विमे उतरविले होते. विमा कंपनीने 34 हजारांच्या वर शेतकर्‍यांना सोयाबीन, बाजरी, कापूस, भुईमुग या पिकांसाठी विमा परतावे दिले आहेत. मात्र परतावे देताना भरलेल्या हप्त्याएवढीही रक्कम दिली नसल्याने विमा कंपन्यांची नफेखोरी पुन्हा एकदा उघड झाली आहे.

विमा कंपनीला सोयाबीन पिकासाठी शेतकरी, राज्य व केंद्र यांचे मिळून हेक्टरी 7 हजार 875 रूपयांचा विमा हप्ता मिळाला होता. विमा कंपनीने शेतकर्‍यांना पीक विमा परताव्यापोटी हेक्टरी 4 हजार 300 ते 4 हजार 900 पर्यंत विमा परतावे दिले आहेत. बाजरी पिकासाठी विमा कंपनीला शेतकरी, राज्य व केंद्र मिळून एकरी 880 चा विमा हप्ता मिळाला होता. कंपनीने परताव्यापोटी शेतकर्‍यांना एकरी 450 ते 700 पर्यंत दिले आहेत. कापसासाठी विमा कंपनीला शेतकरी शासन मिळून विमा हप्त्यापोटी एकरी 3 हजार 240 मिळाले होते. विमा कंपनीने येथेही मोठा नफा मिळवित शेतकंर्‍यांना एकरी 1 हजार 800 पर्यंतच परतावा दिला आहे. भुईमुगासाठी विमा कंपनीला शेतकरी व राज्य व केंद्र मिळून एकरी 1 हजार 800 चा विमा हप्ता मिळाला होता.

विमा कंपनीने या शेतकर्‍यांना परताव्यापोटी एकरी 1 हजार 350 परतावा देवून नफा कमविला आहे. विमा कंपनीकडून देण्यात आलेल्या परताव्यामध्ये सर्वच पिकांसाठी भरलेल्या हप्त्यापेक्षा कमी रकमा देण्यात आल्या असल्याने शेतकर्‍यामध्ये संतापाची भावना तयार झाली आहे. अतिवृष्टीने शेतातील पिकांचे नुकसान झाले. मात्र भरगच्च विमा हप्ते घेवूत हप्त्यापेक्षा कमी परतावे दिल्याने कंपनीने शेतकर्‍यांची थट्टाच केली आहे.

कमीत कमी परतावा हजार रूपयांचा असावा अशा शासन निर्णय आहे. कंपनीचा परतावा जर हजारांच्या आत असेल तर उर्वरीत रक्कम शासन देते व शेतकर्‍याला किमान हजार रूपये मोबदला दिला जातो. विमा कंपनीने अत्यल्प परतावा दिल्याने अनेक शेतकर्‍यांचा परतावा रक्कम हजाराच्या आत आला आहे. त्यामुळे या रकमाही शासन निर्णयाप्रमाणे एक हजार कराव्या लागणार आहेत. त्यासाठी शासनास नव्याने तरतूद करावी लागणार आहे. तोपर्यंत या शेतकर्‍यांचा परतावा रखडणार आहे.

पहिल्या टप्प्यातील पीक विमा परताव्याचे बहुतांश लाभार्थी कर्जत, जामखेड, नगर, संगमनेर, कोपरगाव तालुक्यातील आहेत. राहाता तालुक्यातील केवळ 203 शेतकर्‍यांचा समावेश यामध्ये आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com