पीक विम्याच्या नवा बीड पॅटर्न

शेतकर्‍यांनी आपले पीक ई-पीक पाहणीद्वारे नोंदविण्याची सक्ती
पीक विम्याच्या नवा बीड पॅटर्न

वीरगाव |वार्ताहर| Virgav

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या आकस्मिक प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना विमा संरक्षण मिळावे यासाठी पीकविम्याचा नवा ‘बीड पॅटर्न’ आता केंद्रसरकारच्या अंमलबजावणीने लागू होईल. या योजनेत शेतात जे पीक उभे आहे त्याचाच विमा घ्यावा लागेल.शेतात संबंधित पीक नसेल तर त्याचा विमा मिळणार नाही त्यामुळे शेतकर्‍यांनी काळजीपुर्वक आपले पीक ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे नोंदविणे गरजेचे आहे. यंदा प्रथमच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सरासरी उत्पादकता निश्चित केली जाणार आहे.

यंदाच्या खरीप हंगामात राज्यभरात पीकविम्याच्या बीड पॅटर्न (80:110) नुसार पीकविमा योजना राबविली जाणार आहे. बीड पॅटर्ननुसार शेतकर्‍यांचे नुकसान 110 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास जास्तीची रक्कम राज्य सरकारला द्यावी लागणार आहे. तर कंपन्यांना शेतकर्‍यांना 80 टक्क्यांपेक्षा कमी रक्कम द्यावी लागल्यास उरलेली रक्कम कंपनीला मिळणार नाही. या स्थितीत कंपनीला केवळ 20 टक्के रक्कम मिळेल आणि उर्वरित रक्कम राज्य सरकारला परत करण्याची अट विमा कंपनीवर असणार आहे.

अतिवृष्टी, पूर, गारपीट, दुष्काळ, भूस्खलन यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान होते. अशावेळी कंबरडे मोडलेल्या शेतकर्‍यांना भरपाईची मदत देण्याची मागणी समोर येते. अशा अडचणीच्या काळात शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येते. पण ही योजना शेतकर्‍यांच्या हिताऐवजी विमा कंपन्यांचे उखळ पांढरे करणारे असल्याची टीका होत होती. यावर उपाय म्हणून काही प्रमाणात कंपन्यांचा नफा कमी करून शेतकरी हिताला प्राधान्य देणार्‍या पिक विम्याच्या ‘बीड पॅटर्न’ची राज्यात अंमलबजावणी व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होत होती.

पीकविम्यासाठी अधिसूचित क्षेत्रात निश्चित केलेल्या पिकाचे नुकसान होऊन होणारी मोठी आर्थिक हानी टाळण्यासाठी शेतकर्‍यांना योजनेत सहभागी होता येईल.शेतकर्‍यांवर सहभागी होण्याचे कोणतेही बंधन नाही. पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांना सहभागी व्हायचे नसल्यास ते बँकेला कळविणे गरजेचे आहे.

नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अधिसूचित क्षेत्रात नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत केंद्र सरकारचे पीक विमा संबंधित विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी, महसूल खात्याचा टोल फ्री क्रमांकावर नुकसानीची माहिती द्यावी लागेल. संपूर्ण हंगामात सरासरी पेक्षा कमी उत्पादन आल्यास नुकसान भरपाई द्यायच्या सूत्रानुसार पीकविम्यास पात्र असणार्‍या शेतकर्‍यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे.

पीकविम्याचा नवा ‘बीड पॅटर्न’ संकटग्रस्त शेतकर्‍यांसाठी दिलासादायक ठरेल अशी अपेक्षा असल्याने याबाबद शेतकर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज आहे.

हेक्टरनिहाय पीकविमा रक्कम

भात -800 ते 1036, ज्वारी-400 ते 650, बाजरी-360 ते 379, नाचणी-275 ते 400, मका-120 ते 712, तूर-500 ते 737, मूग-400 ते 517, उडीद-400 ते 521, भुईमूग-580 ते 680, सोयाबीन-625 ते 1146, तीळ-440 ते 500, कारळे- 275, कापूस-1150 ते 3000 आणि कांदा-2300 ते 4072.

विमा संरक्षणाचे निकष

पेरणीपासून काढणीपर्यंत पिकाच्या उत्पादनात येणारी तूट. अपूरा पाऊस, प्रतिकूल हवामानामूळे पिकाची पेरणी 75 टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर न झाल्यास. पूर, अतिवृष्टी, पावसातील खंड, दुष्काळामुळे निश्चित केलेल्या उत्पादनात 50 टक्केपेक्षा जास्त घट आल्यास. पीक काढणीनंतर अवकाळी आणि परतीच्या पावसात पीक भिजून नुकसान झाल्यास. पूर, भूस्खलन, गारपीट आदींमुळे नुकसान झाल्यास.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com