पीक कापणी वेळेत करणे आवश्यक

निवासी उपजिल्हाधिकारी निचित यांचे आवाहन
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पीक विमा नुकसान भरपाई शेतकर्‍यांना मिळायला हवी. त्यासाठी पीक कापणी प्रयोग अचूक व स्पष्ट व्हावेत. महसूल, कृषी व जिल्हा परिषद या तिन्ही यंत्रणांनी शेतकर्‍यांच्या हिताची कामे करावीत. पीक कापणी प्रयोग अचूक व वेळेत केल्यास शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळताना अडचणी येणार नाहीत, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले.

कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगाम पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण वर्गाप्रसंगी मार्गदर्शन करताना निचित बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, दिलीप कुलकर्णी, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी मनोजकुमार (पुणे), विलास नलगे, तंत्र अधिकारी (सांख्यिकी) बाळासाहेब नितनवरे, उपविभागीय कृषी अधिकारी विलास नलगे, गहिनीनाथ कापसे, सुधाकर बोराळे, अनिल गवळी, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, रवींद्र माळी, अन्सार शेख, दानिश शेख, पल्लवी लोहाळे, सौरभ उबाळे आदी उपस्थित होते. निचित पुढे म्हणाले, कर्मचार्‍यांनी सीसीई अ‍ॅग्री अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर पीक कापणी प्रयोगाचे परीक्षण नोंदवावे.

शेतकर्‍यांसाठी शासनाच्या विविध योजना असून, त्याचा त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्रयत्न करावेत. शेतकर्‍यांच्या बांधावर कृषी अधिकारी व कर्मचारी पोहोचल्याने त्याचा लाभ शेतकर्‍यांना चांगल्या प्रकारे मिळत असल्याचे दिसून येत आहे, असे सांगितले. पीक कापणीसंदर्भात काळजी घेणे आवश्यक असून, याबाबत माहिती देताना शिवाजीराव जगताप म्हणाले, प्लॉटचे उत्पन्न नोंदणीचे काम सूचनेनुसार व निर्धारित वेळापत्रकानुसार करावे.

प्रयोगासाठी आधी निवडलेले गाव अथवा शेत किंवा प्लॉट विशिष्ट कारणाशिवाय रद्द करू नये. त्याऐवजी दुसरे शेत निवडू नये. प्रयोगासाठी निवडलेल्या गावातील प्रयोगाचे पिकाखालील सर्व सर्व्हे, गट नंबरचा समावेश असावा. जिल्ह्यातील प्रत्येक हंगामाचा प्रशिक्षण वर्ग झाल्यानंतर आठवडाभरात प्रयोगाचे पीक कमीत कमी दोन सव्हे, गट नंबरमध्ये असल्याची खात्री करावी, असे ते म्हणाले. दिलीप कुलकर्णी यांनी पीक कापणी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com