पीक नुकसान भरपाईचे आ. पवारांचे कृषीमंत्र्यांना साकडे; मुंबईत घेतली भेट

आ . रोहित पवार
आ . रोहित पवार

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

कर्जत जामखेड मतदारसंंघासह राज्यभरातील शेतकर्‍यांच्या पिकांचे विविध कारणांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांना मिळावी यासाठी आ. पवार यांनी नुकतीच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची मुंबईत भेट घेत साकडे घातले.

आ. पवार यांनी सत्तार यांना सागितले की, कर्जत व जामखेड हे दोन्ही तालुके अवर्षण प्रवण असून येथील शेती ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून अनेक गावांमध्ये समाधानकारक पाऊस पडला नसल्याने तूर, उडीद, बाजरी या दोन्ही तालुक्यात प्रामुख्याने घेतल्या जाणार्‍या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

तुर पिकांवर वांझ रोग आल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. कर्जत जामखेड तालुक्यांत एकूण 21 हजार हेक्टर तुरीचे उत्पादन घेतले जाते. अशा शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला द्यावेत व पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई तात्काळ द्यावी व पीक विमा न भरलेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंती कृषिमंत्र्यांकडे केली.

कृषी आयुक्तांना आदेश

महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील आ. रोहित पवार यांच्या मागणीची दखल घेत कृषी आयुक्तांना तूर पिकांवर आलेल्या रोगामुळे होत असलेल्या नुकसानीचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शेतकर्‍यांना मदत मिळावी यासाठी तात्काळ प्रयत्न करत कृषी सचिवांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com