करोनाच्या संकटात संगमनेरातील नगरसेवक गायब

करोनाच्या संकटात संगमनेरातील नगरसेवक गायब

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

मताच्या जोगव्यासाठी दारो दारी फिरणारे संगमनेर शहरातील नगरसेवक करोनाच्या संकटात याच मतदारांपासून दूर आहे. प्रभागातील मतदारांना मदत करण्याऐवजी शहरातील अनेक प्रभागातील नगरसेवक गायब झाले आहे. मतदारांना वार्‍यावर सोडून पळ काढणार्‍या या नगरसेवकांबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

संगमनेर शहरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रशासन व वेगवेगळ्या सेवाभावी संस्था नागरिकांच्या मदतीसाठी धावले आहे. गतवर्षीही अनेक सेवाभावी संस्थांनी टाळे बंदीच्या काळात गोरगरिबांना जेवणाच्या डब्याची व्यवस्था केली होती. अनेक दानशूर व्यक्तीने आर्थिक मदत केली होती. यावर्षी पुन्हा करोनाचे संकट वाढले आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात करोना बाधित रुग्ण आढळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लागू केल्याने नागरिकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अडचणीत असलेल्या मतदारांना सहकार्य करण्याची जबाबदारी त्या त्या भागातील नगरसेवकांवर आहे. मात्र संगमनेर मधील नगरसेवक आपल्या मतदारांची सेवा करण्याऐवजी गायब झाले आहे. मतदानासाठी हेच नगरसेवक दारो दारी फिरत होते.

विकास कामांचा बडेजाव मिरवणार्‍या व सोशल मीडियावर प्रसिद्धीची हौस भागवून घेणार्‍या अनेक नगरसेवकांना अडचणीत मात्र आपल्या मतदारांचा विसर पडला आहे. काही नगरसेवक न केलेल्या कामाचे श्रेय सोशल मिडीयाच्या माध्यमातून घेताना दिसत आहे. नागरिकांना गरज असताना हे नगरसेवक मात्र त्यांना मदत करताना दिसत नाहीत.

किशोर टोकसे यांचे सर्वत्र कौतुक

शहरातील विविध प्रभागातील नगरसेवक गायब असताना मेनरोड परिसरातील नगरसेवक किशोर टोकसे मात्र आपल्या प्रभागात ठाण मांडून आहे. प्रभागातील करोना बाधितांना रुग्णालयात हलविण्यापासून त्यांची सर्व सेवा करण्याचे काम टोकसे करताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांनी करोनाचा अनुभव घेतला आहे. असे असतानाही स्वतःच्या जीवाची काळजी न करता ते मतदारांच्या सेवेसाठी उपलब्ध होत असल्याने शहरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com