
उंबरे |वार्ताहर| Umbare
करोना संकट लवकरात लवकर थांबावे यासाठी दयाघन परमेश्वराकडे याचना करून या संकटाचा नायनाट करण्यासाठी भाविक मंडळी मनोभावे प्रार्थना करीत आहेत. सध्या मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना व रोजे सुरू आहेत. वांबोरी येथील प्रांजल व क्रांती या दोन भगिनींनी करोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी रोजा पूर्ण केला आहे.
राहुरी तालुक्यातील वांबोरी गावात खळवाडी परिसरात राजू नागरगोजे व अब्बासभाई शेख हे शेजारीच राहणारे हे दोन कुटुंब! मोलमजुरी करून उदरनिर्वाह करताना एकमेकांच्या सुख-दुःखात नेहमीच सहभागी होतात. मात्र सध्या आलेल्या करोनाच्या संकटामुळे माणसे एकमेकाला पोरकी झाल्यासारखे वाटत आहे.
हा आजार नष्ट होऊन सर्व मानवजातीला या रोगापासून मुक्ती मिळू दे, अशी प्रार्थना करून वांबोरीच्या प्रांजल राजू नागरगोजे व क्रांती राजू नागरगोजे या दोन हिंदू कन्यांनी मुस्लीम समाजातील पवित्र रमजानचा रोजा पूर्ण केला. त्यांच्यासमवेत वाहिद रियाज शेख यानेही रमजानचा रोजा पूर्ण केला.
अत्यंत निरागसपणे व मनोभावे सुमारे पंधरा तास अन्न पाणी न घेता त्या दयाघनाला करोनाचे संकट दूर करण्यासाठी 12 ते 15 वर्षे वय असणार्या या लेकरांच्या प्रार्थनेचे सार्थक होऊन या भूतलावरील सर्व मानवजात करोनाच्या संकटातून मुक्त होईल, आशा करू या!