दीड वर्षात 22 टोळ्यांविरूध्द ‘मोक्का’

एसपी पाटील यांचा दणका || 127 गुन्हेगारांचा सहभाग
दीड वर्षात 22 टोळ्यांविरूध्द ‘मोक्का’

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मनोज पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संघटीत गुन्हेगारी करणार्‍या 22 टोळ्यांविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमातील (मोक्का) कायद्यान्वये कारवाई केली आहे. या टोळ्यांमध्ये एकुण 127 सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. संघटीत गुन्हेगारी करणार्‍या टोळ्यांना या कारवाईमुळे चाप बसला आहे.

सप्टेंबर, 2020 मध्ये मनोज पाटील यांनी पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतली. गुन्हेगार रेकॉर्डवर घेण्यासाठी त्यांनी ‘टू-प्लस’ योजना आणली. दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींची माहिती यामध्ये संकलीत करण्यात आली आहे. यामुळे संघटीत गुन्हेगारी करणार्‍या टोळीविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी अधिक सोपे झाले आहे. मालमत्तेविरोधात संघटीत गुन्हेगारी करणार्‍या टोळ्यांची माहिती संकलीत करून त्यांच्यावर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचा धडाका अधीक्षक पाटील यांनी लावला आहे. सन 2020 मध्ये केवळ दोन टोळ्यांविरूध्द मोक्का लावण्यात आला होता. तर 2021 मध्ये 15 आणि मे, 2022 अखेर पाच टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

पैसे मिळण्याच्या उद्देशाने खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करणे, रस्तालुट, अपहरण असे गंभीर गुन्हे असणार्‍या टोळ्यांविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात येते. एखाद्या टोळीने संघटीतपणे गुन्हा केल्यानंतर पोलिसांकडून त्या टोळीला अटक करण्यात येते. विशेष करून स्थानिक गुन्हे शाखेची भूमीका यामध्ये महत्वाची असते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी टोळीला अटक केल्याबरोबरच ‘टू-प्लस’च्या मदतीने टोळीवरील गुन्ह्यांची माहिती काढली जाते.

संबंधीत टोळीने शरिराविरूध्द आणि मालाविरूध्द एकत्रित काही गुन्हे केले आहेत का? याची माहिती संकलित करण्यात येते. ज्या पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा घडला त्यांना याबाबत माहिती दिली जाते. यानंतर स्थानिक पोलीस ठाणे मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार करते आणि अधीक्षक पाटील यांच्या परवानगीने तो प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मंजूरीसाठी पाठविला जातो.

अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात मोक्का कारवाई झाल्यामुळे संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहेत.

2018 मध्ये पाच, 2019 मध्ये 19 गुन्हेगारांचा सहभाग असलेल्या एक तर 2020 मध्ये दोन टोळ्यांविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. 2021 मध्ये 15 टोळ्या आणि मे, 2022 पर्यंत पाच टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. संघटीत गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अधीक्षक पाटील यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com