
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
घरफोडी, जबरी चोरी, जनावरे, सोयाबीन चोरी, खुनाचा प्रयत्न व गुंडगिरी करणारा माळवाडगाव येथील आरोपी मोटारसायकल रस्त्यात सोडून गावाच्याबाहेर उसाच्या शेतात पळत असताना श्रीरामपूर तालुका पोलिसांनी पाठलाग करत शिताफीने पाठलाग करून पकडला.
काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात श्रीरामपूर यांना गुप्त बातमी मिळाली की, श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील वारवार मालमत्ता चोरीचे गुन्हे करणारा आरोपी वेशांतर करून फिरत आहे. त्यानुसार पोलीस पथक तयार करून वेषांतर करत माळवाडगाव गावात सापळा लावला.
दरम्यान सुजित अनिल आसने रा. माळवाडगाव, ता. श्रीरामपूर हा त्यांच्या मोटारसायकलवर येताना दिसला. त्यास पोलिसांची चाहुल लागताच तो त्याची मोटारसायकल रस्त्यात सोडून गावाच्या बाहेर उसाचे शेतात पळत असताना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्यास पकडले. बजाज कंपनीची मोटारसायकलसह त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून अटक केली तर दुसरा आरोपी तेजस उमेश मोरे यासही अटक केली.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, पोलीस उपनिरीक्षक संजय निकम, पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ बड़े, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र लंबाडे, पोलीस नाईक अशोक पवार, पोलीस नाईक आबासाहेब गोरे, पोलीस नाईक प्रशांत रणनवरे, पोलीस नाईक अनिल शेंगाळे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष कराळे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार, चॅांदभाई पठाण यांनी सदरची कारवाई केली आहे.
या दोन्ही आरोपींविरुध्द श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे, वैजापूर तालुका वीरगाव पोलीस ठाण्यात 497, 379, 457, 380, 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हे दाखल आहेत.